अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; इंद्रायणीत मारली होती उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:42 PM2024-08-28T15:42:42+5:302024-08-28T15:43:39+5:30
महिलेने नदीत उडी मारण्यापूर्वी एका मित्राला फोन केला होता
आळंदी : आळंदीतील इंद्रायणीनदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या त्या महिला पोलीसाचा अखेर चौथ्या दिवशी मृतदेह सापडला आहे. अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे या पोलीस महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केदार यांनी इंद्रायणीनदीच्या नवीन पुलाजवळील गरुड खांबावरून नदीत उडी मारली होती. त्यानंतर आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु होते. अखेर बुधवारी (दि. २८) संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला आहे.
दरम्यान अनुष्का केदार यांनी नदीत उडी मारण्यापूर्वी तिच्या एका मित्राला फोन केला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीत अनुष्का केदार यांनी रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने तिच्या एका मित्राला फोन केला असल्याचे उघडकीस आले. मात्र टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या. रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. मात्र नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली.
दरम्यान आळंदी पोलिसांकडून आळंदीपासून गोलेगाव पर्यंतच्या हद्दीत शोध घेतला जात होता. त्यापुढे पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द सुरु होत असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांना शोध घेण्याबाबत माहिती देण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून उजनी धरणापर्यंत असलेल्या पोलीस ठाण्यांना शोध घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. अखेर संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला.