अखेर ऑनलाईन पीयुसीवर शिक्कामोर्तब : परिवहन विभागाचे परिपत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 08:23 PM2019-09-24T20:23:13+5:302019-09-24T20:25:55+5:30
अधिकाऱ्यांमधील या गोंधळाच्या स्थितीमुळे वाहनचालक व पीयुसी सेंटरचालकांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे : जुन्या पध्दतीने पीयुसी प्रमाणपत्रावर फुली मारून परिवहन विभागाने ऑनलाईन प्रमाणपत्रावर मंगळवारी (दि. २४) शिक्कामोर्तब केले. विभागाकडून कोणताही आदेश नसल्याने मागील आठवड्यापासून संभ्रमावस्थेत असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ऑनलाईन प्रमाणपत्राची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील कारचे राज्यातील पीयुसी सेंटरवरून बोगस प्रमाणपत्र मिळाल्याचे ' लोकमत 'ने उजेडात आणल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर लगेचच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यात ऑनलाईन पीयुसीची घोषणा केली होती. पण परिवहन विभागाकडून याबाबत कोणतेही अधिकृत आदेश नव्हते. त्यामुळे अधिकायांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. पीयुसी सेंटरच्या परवान्याची मुदत असेपर्यंतच त्यांना जुन्या पध्दतीने पीयुसी प्रमाणपत्र देता येईल. तसेच अशा सेंटरला भविष्यात मान्यता मिळणार नाही, असे काही अधिकारी सांगत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवार (दि. २०) पासून केवळ ऑनलाईन पीयुसी प्रमाणपत्र मिळणार असल्याचे सांगितले होते. अधिकाऱ्यांमधील या गोंधळाच्या स्थितीमुळे वाहनचालक व पीयुसी सेंटरचालकांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. काही सेंटरचालकांनी जुने प्रमाणपत्र देणे सुरू ठेवले होते. तर काहींनी बंद केल्याचे दिसून आले.
अखेर मंगळवारी परिवहन विभागाने जुन्या पध्दतीचे पीयुसी प्रमाणपत्र देणे बंद करणार असल्याचे जाहीर केले. विभागाकडून तसे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. सहायक प्रादेशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनची पीयुसी सेंटर संगणकीकरणाबाबत कालावधी वाढून देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने मंगळवारपासून संगणकीकृत पीयुसी देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सर्व पीयुसी सेंटर संगणकीकृत करणे अनिवार्य आहे. त्यामुळे यापुढे संगणकीकरण केल्याशिवाय संबंधित चालकांना प्रमाणपत्र देता येणार नाही. मंगळवारपासून जुन्या पध्दतीने पीयुसी दिले जाणार नाही. तसे आढळून आल्यास सेंटर चालकांवर गुन्हा दाखल करून मान्यता रद्द केली जाईल. वाहनचालकांनी यापुढे केवळ ऑनलाईन पध्दतीनेच पीयुसी प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन सांगोलकर यांनी केले. दरम्यान, मंगळवारपुर्वी जुन्या पध्दतीने काढलेल्या पीयुसी प्रमाणपत्राची मुदत संपेपर्यंत ती ग्राह्य धरली जातील. मात्र यापुढे केवळ ऑनलाईन पीयुसीलाच मान्यता असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.