अखेर आरओ प्लांटला परवानगी..! पिंपरी-चिंचवड महापालिकेने बनवली नियमावली

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 22, 2025 13:30 IST2025-02-22T13:29:08+5:302025-02-22T13:30:12+5:30

तपासणीनंतर महापालिकेने ५८ खासगी आरओ प्लांटला टाळे ठोकले

Finally permission for RO plant Pimpri-Chinchwad Municipal Corporation has made regulations | अखेर आरओ प्लांटला परवानगी..! पिंपरी-चिंचवड महापालिकेने बनवली नियमावली

अखेर आरओ प्लांटला परवानगी..! पिंपरी-चिंचवड महापालिकेने बनवली नियमावली

पिंपरी : आरओ प्लांटमधील दूषित पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील अनेक भागांत गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा आजार पसरत असल्याचे स्पष्ट झाल्यावर तपासणीनंतर महापालिकेने ५८ खासगी आरओ प्लांटला टाळे ठोकले होते. जीबीएस रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर तसेच प्लांटचालकांच्या मागणीनंतर आता महापालिकेने हे प्लांट पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील प्रकरण १४ नियम १८ नुसार ज्यातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असेल, असा कोणताही खाजगी जलप्रवाह, झरा, तलाव, विहीर, अन्य जागा इत्यादी चांगल्या प्रकारे दुरुस्त स्थितीत ठेवण्याची किंवा सदर स्त्रोतांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

सद्यस्थितीत किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला, आदी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुणे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत नाही. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने गुणात्मकदृष्ट्या योग्य दर्जाचे पाणी देणाऱ्या आणि विहित निकषांची पूर्तता करणारे खासगी आरओ प्लांट पुन्हा सुरु करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. परंतु त्याकरिता स्वतंत्रपणे नियमावली तयार करणे आवश्यक असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीला प्रशासनाने मान्यता दिली आहे. तयार करण्यात आलेली नियमावली आरओ चालकांवर बंधनकारक असणार आहे.
 
अशी आहे नियमावली...

-आरओ प्लांटची महापालिकेकहे नोंदणी करणे आवश्यक
-आरओ प्लांटच्या मूळ उत्पादक कंपनीकडून किंवा प्लांट दुरुस्ती करणाऱ्या संस्थेकडून योग्यतेचा दाखला सादर करावा किंवा देखभाल दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरु असतानाचे सुस्पष्ट, तारीख, वेळ आणि जीओ टॅगसह फोटो काढावे
-मुख्य उत्पादक कंपनी किंवा प्लांट दुरुस्त करणारी संस्था यांचेकडून सदर प्लांटच्या आउटलेटचे पाणी जागतिक आरोग्य संस्थेच्या आयएस १०५०० (२०१२) नुसार शुद्धीकरण करण्यासाठी प्लांट योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याचा दाखला सादर करावा
-राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रयोगशाळेकडून आरओ प्लांटसचे पाणी पिण्यास योग्य आहे का याची वारंवार तपासणी करून अहवाल सादर करावा
-आरओ प्लांटला महापालिकेचे पाणी वापर करत असल्यास नळजोड नियमान्वित करून, बिगर घरगुती दराने मीटरवर सदर पाण्याचे बिल जमा करावे
-संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडीन आरोग्य निरीक्षकांनी आरओ प्लांटचे वेळोवेळी नमुने घेऊन त्यांची तपासणी करावी आणि पाणी पिण्यास अयोग्य आढळल्यास सदर प्लांट बंद करण्याबाबत कारवाई करावी

महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना शुद्ध व योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. तरी, संबंधित आरओ प्लॅन्ट धारकांनी महापालिकेने दिलेल्या अटी व शर्ती आणि नियमांचे पालन करून अधिकृत परवानगी घेऊनच आरओ प्लांट सुरू ठेवावेत. - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका

Web Title: Finally permission for RO plant Pimpri-Chinchwad Municipal Corporation has made regulations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.