अखेर पीएमपी कामगारांना मिळणार बोनस
By admin | Published: October 21, 2014 05:08 AM2014-10-21T05:08:49+5:302014-10-21T05:08:49+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कामगारांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कामगारांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दिवाळी तोंडावर आली, तरी पीएमपी कामगारांना बोनस देण्याबाबत पीएमपी प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलण्यात येत नव्हती. त्यामुळे कामगारांना तीन दिवस आंदोलन करावे लागले. त्यानंतर सोमवारी पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेकडून पीएमपीला बोनसचे सुमारे २५ कोटी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी इंटकच्या पदाधिकारी व पीएमपी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कामगारांना ८.३३ टक्के बोनस मंजूर करण्यात आला. तसेच, प्रत्येकी आठ हजार रुपयेही दिले जाणार आहेत, असे इंटकचे सरचिटणीस नुरुद्दीन इनामदार व उपाध्यक्ष अशोक जगताप यांनी सांगितले. कामगारांच्या इतर मागण्यांबाबत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)