अखेर 'ती' गावात आली तब्बल ७५ वर्षा नंतर; पीएमपीचे आगमन अन् गावकऱ्यांमध्ये आनंदाचे उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:30 PM2023-03-20T12:30:29+5:302023-03-20T12:30:38+5:30
बस नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांची गैरसोय होत असे
धनकवडी : " ती " गावात आली...तब्बल ७५ वर्षा नंतर.! तिच्या येण्याने गावात आनंदाचे उधाण आले तिला बघण्यासाठी गाव जमला, हारतूरे, पुजापाठाने तिचे स्वागत झालं. उर्वरित आंबेगाव खुर्द सोबत महापालिकेत सहभागी झालेल्या दुर्गम कोळेवाडी ला पीएमपीचा स्पर्श झाला आणि आख्खा गाव हर्ष आनंदात न्हाऊन निघाला. आजवर बस न पोहचलेल्या महापालिकेतील गावात, रविवार (दि.१९) पासून बस सेवा सुरू झाली आणि माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या पाठपुराव्याला यश आले.
कोळेवाडी गाव दक्षिण उपनगरामधील महापालिके चे शेवटचे टोक, सुमारे पाचसहाशे लोक संख्या असलेले गाव. हे गाव सुरुवातीला आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी कोळेवाडी यांची ग्रुप ग्रामपंचायत होते. आंबेगाव खुर्द महापालिकेत अंशतः समाविष्ट झाल्या नंतर ग्रामपंचायती स्वतंत्र झाल्या, या गावा त अद्यापही मुलभुत सूविधा पोहचल्या नाहीत. अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. स्वातंत्र्याचे ७५ वर्ष उलटले. मात्र, गावात बससेवा पोहचली नव्हती.
जांभूळवाडी पर्यंत पीएमपीएल कात्रज आगाराच्या बस फेऱ्या मारत असताना आजतागायत कोळे वाडी मात्र दुर्लक्षित होती, त्यामुळे गावकऱ्यांना तब्बल तीन किमी पायी प्रवास करून जांभूळवाडी गाठावे लागत असे. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती, जनहित विकास मंचाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे यांनी गावकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेत गावात बस फेरी सूरू करण्याची मागणी लावून धरली,
यासाठी माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी पाठपुरावा केला, पीएमपीएल च्या मुख्य खात्याला पत्र दिले होते. दरम्यान कोळेवाडी गावातील प्रवाशांचा विचार करून अखेर पीएमपीएल ने हिरवा कंदील दिला अन् पहिल्यांदाच बस सेवा गावात सुरू झाली. बसच्या स्वागतासाठी गाव एकवटला. गावकऱ्यांनी बस ला हार घालून सजवलं, महिलांनी आरती ओवाळली अन् वाहक, चालकाचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी जांभूळवाडीच्या उपसरपंच चेतना जांभळे, योगेश जांभळे, पोलीस पाटील गितांजली जांभळे, सोनल जांभळे, अरुण पायगुडे, समस्त कोळेवाडी ग्रामस्थ, पीएमपीएल चे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.
''कोळेवाडी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षां पासूनची मागणी होती, जांभूळवाडी संपल्यावर थोड्याच अंतरावर मोठा चढण मार्ग आणि रस्त्याची समस्या होती, रस्ता वाहतूक योग्य झाला, त्यानुसार आम्ही पाहणी केली, चाचणी ( ट्रायल ) घेतली, या संदर्भात माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी मुख्य खात्यात पत्र व्यवहार आणि पाठपुरावा केला होता. - कात्रज आगार प्रमुख गोविंद हांडे''