अखेर खासगी डेअरींना मिळाले दूध भुकटी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:31+5:302020-12-02T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर दूध भुकटीच्या किमती कमी झाल्यानंतर राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलीटर तीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर दूध भुकटीच्या किमती कमी झाल्यानंतर राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलीटर तीन रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे अनुदान मिळण्यासाठी संबंधित दूध डेअरी मालकांकडून प्रचंड पाठपुरावा सुरू होता. अखेर सरकारने थकीत अनुदानापोटी २५ कोटी ६९ लाख ८८ हजार ९८२ रुपयांचे अनुदान नुकतेच वितरित केले. यात दूध भुकटी तयार करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पाच आणि नगर जिल्ह्यातील एका दूध डेअरीचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाच्या भुकटीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले होते. त्यामुळे खाजगी दूध संघ अडचणीत सापडले. त्यासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार सरकारने गायीच्या दुधाला १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२० या काळात प्रतिलीटर तीन रुपये अनुदान देण्याची योजना राबविली. वित्त विभागाकडून ही रक्कम दुग्ध व्यवसाय विकास विभागाला मिळाली. अनुदान वाटपाची रक्कम खासगी बँकेऐवजी राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार काम सुरु असून, अनुदान वितरणास थोडा अवधी लागल्याची माहिती पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांनी दिली. त्यानुसार नुकतीच अनुदान रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
-------
या दूध डेअरींना मिळाले अनुदान -
- एल. व्ही. डेअरी, पाटस - ९० लाख ११ हजार
- श्रायबर डायनामिक्स डेअरीज प्रा. लि. - ४ कोटी ६८ लाख ९५ हजार
- इंदापूर डेअरी अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस लि. - ७ कोटी ३५ लाख ९१ हजार
- पराग मिल्क फुडस लि. - ६ कोटी ९२ लाख ४५ हजार
- कुतवळ फुडस प्रा. लि. - ३ लाख ७५ हजार
- प्रभात डेअरी प्रा. लि. अहमदनगर - ५ कोटी ७८ लाख