Raj Thackeray:...अखेर पुण्यात 'राज' गर्जना होणार; सभेसाठी जागा ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:19 PM2022-05-17T13:19:36+5:302022-05-17T13:21:32+5:30
राज ठाकरेंचा शनिवारी पुणे दौरा निश्चित झाला आहे
पुणे : राज ठाकरेंचा शनिवारी पुणे दौरा निश्चित झाला आहे. राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन शनिवारी २१ मेला डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागेत पुणे शहर मनसे कडून करण्यात येत आहे. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला होता. त्यानिमित्ताने २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार असून याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले होते. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार होते. पण वाहतूक समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीने डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागा निश्चित करण्यात आली असल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले आहे.
डेक्कन जिमखाना येथील मुठा नदीपात्रात होणार सभा
सदर ठिकाण सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन तसेच सभेमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण न होणारे असावे अशा सरकारी यंत्रणेच्या सूचना मनसेला मिळाल्या आहेत. शासकीय यंत्रणेने केलेल्या सुचने नुसार मुठा नदी पात्रातील डेक्कन जिमखाना येथील नदीपात्रातील जागा निश्चित करण्यात आली आहे. सदर ठिकाणी या अगोदरही मनसेच्या सभा झाल्या आहेत. या बाबतच्या संबंधित यंत्रणेच्या नाहरकत पत्र आपल्याला आम्ही देऊच तरी सदर ठिकाणी सभेसाठी स्टेज उभारणीस सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेट बांधण्यास तसेच विदयुत व्यवस्थेसाठी मनोरे उभारण्यास परवानगी द्यावी. तसेच सभेच्या दिवशी शनिवार दि २१/५/२२ रोजी स्पीकरच्या वापरास परवानगी द्यावी हि विनंती. तरी आपण सदर कमी आम्हाला सहकार्य करीत शनिवार दि २१/५/२२ रोजी परवानग्या उपलब्ध करून द्याव्या हि नम्र विनंती. असे अजय शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.