हुश्श...! अखेर उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा; मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: May 29, 2023 04:17 PM2023-05-29T16:17:31+5:302023-05-29T16:18:07+5:30
उष्णतेपासून काही काळ होईना सुटका झाली, आता वातावरण किती मस्तय ! पुणेकरांच्या तोंडी अशी प्रतिक्रिया
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. परंतु, आज दुपारनंतर अचानक आकाशात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे उष्णतेपासून काही काळ होईना सुटका झाली. आता वातावरण किती मस्तय ! अशीच प्रतिक्रिया पुणेकरांच्या तोंडून येत होती. शहरावरील आकाशात सिबिल क्लाऊड तयार झाल्याने शिवाजीनगर परिसरात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
येत्या दोन-चार दिवस दुपारी आकाश निरभ्र राहणार असून, सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. शिवाजीनगर परिसरात आकाशात ढग असल्याने पावसाचा अंदाज आहे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी आकाश निरभ्र असेल आणि सायंकाळी मात्र पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाच दिवस पुन्हा उकाडा जाणवेल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.