...अखेर सह्याद्री हॉस्पिटल वाढीव बिलाचे २२ लाख परत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:43+5:302021-06-04T04:08:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाबाधित रुग्णांकडून वाढीव बिल आकारणी करणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलने गुरुवारी वाढीव बिलाची रक्कम परत करण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांकडून वाढीव बिल आकारणी करणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलने गुरुवारी वाढीव बिलाची रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच महापालिकेने सूचना केल्याप्रमाणे ३४ कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीव बिलांचे २२ लाख ४८ हजार ३३३ रुपये परत करीत असल्याचे पत्र सह्याद्री हॉस्पिटलने महापालिकेला गुरुवारी दिले आहे़
या पत्रात संबंधित कोरोनाबाधित रुग्णांचे नाव, परत करत असलेली रक्कम व धनादेश क्रमांकासह इतर तपशीलही सह्याद्री हॉस्पिटलने महापालिकेस सादर केला आहे. याचबरोबर ‘महापालिकेच्या आदेशानुसार संबंधित रुग्णांचे पैसे परत करण्यात येत असल्याने, आमच्या रुग्णालयाच्या नर्सिंग होम परवान्यांच्या निलंबनाची व इतर कोणतीही कारवाई करू नये,’ अशी विनंतीही सह्याद्री हॉस्पिटलकडून लेखी स्वरूपात यापत्राद्वारे केली आहे.
---------------------
सह्याद्री हॉस्पिटलचा नर्सिंग होमचा परवाना रद्द करण्याचे पाऊल महापालिकेने उचलल्यावर, गुरुवारी हॉस्पिटलने कोरोनाबाधित रुग्णांचे पैसे परत देण्याची तयारी दाखविली आहे. तसेच हॉस्पिटलने ३४ कोरोनाबाधितांना पैसे परत दिले.
-डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका़
----------------------
अद्याप कोरोनाबाधितांना हॉस्पिटलकडून संपर्क नाही
सह्याद्री हॉस्पिटलने ‘त्या’ ३४ कोरोनाबाधितांचे वाढीव बिलांचे पैसे परत करत असल्याचे सांगून, रकमेचा धनादेश व त्याच्या क्रमांकासह तपशील महापालिकेला सादर केला आहे. मात्र, अद्यापही हॉस्पिटल प्रशासनाकडून संबंधित कोरोनाबाधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांना संपर्क साधून धनादेश घेऊन जाण्याबाबत संपर्क साधण्यात आलेला नाही.
--------------------------
कोरोनावरील उपचार करताना एक महिन्याच्या काळात आमच्याकडून सह्याद्री हॉस्पिटलने १० लाख ३६ हजार रुपयांचे बिल झाल्याचे सांगितले. यामुळे या अवाजवी बिलाविरोधात आम्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर वारंवार हॉस्पिटलमध्येही खेटा मारल्या; परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आजअखेर पैसे परत देणार असल्याचे कळत आहे; पण प्रत्यक्षात अजून हातात काहीच आलेले नाहीत.
- वाढीव बिलाचा बळी पडलेला एक रुग्ण
--------------------------