अखेर बारामती तालुक्यातील अदानींच्या खाजगी विमानतळावर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:00 PM2022-05-12T23:00:00+5:302022-05-12T23:00:01+5:30
पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाचा गाशा गुंडाळला
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे : बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्याच्या बाऊंड्रीवर खाजगी विमानतळ उभारण्यात येणार आहे. या तीन तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे साडेतीन हजार एकर जमिनीवर अदानी ग्रुपच्या वतीने मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून, यामध्ये विमानतळ प्रस्तावित आहे. औद्योगिक महामंडळाच्या प्रस्तावाला नुकतेच दिल्लीच्या हाय पाॅवर कमिटीने मंजुरी दिली आहे. बारामती तालुक्यातील अदानी ग्रुपच्या खाजगी विमानतळावर शिक्कामोर्तब झाल्यानेच पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाचा गाशा गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उड्डाण जवळजवळ निश्चित झाले असताना राज्य शासनाने पाठवलेल्या नवीन जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द करत मोठा धक्का दिला होता. परंतु यामागची खरी वस्तुस्थिती बारामती तालुक्यातील अदानींचे खाजगी विमानतळ हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरंदर विमानतळाच्या नव्या जागेचा परवाना राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने रद्द केला. त्यामुळे विमानतळ जुन्या जागेत होणार का आणि त्याला परवानगी मिळणार का हा विषय चर्चेत असतानाच आता अदानी समूहाकडून या प्रस्तावित विमानतळाच्या लगत किंबहुना विमानतळाच्या क्षेत्रात जाणाऱ्या काही गावांमध्ये देखील मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.
या मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्कसाठी पुरंदर तालुक्यातील राजुरी, पिसे, नायगाव आणि पिंपरी बारामती तालुक्यातील आंबी, भोंडवे वाडी आणि चांदगुडे वाडी तर दौंड तालुक्यातील खोर या आठ गावांमधील साडे तीन हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे. औद्योगिक महामंडळाने या जागेचे सर्वेक्षण करून मल्टी मेडल लॉजिस्टिक पार्क च्या आराखडयाचा प्रस्ताव केंद्र सरकारला मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला नुकतेच दिल्ली हाय पाॅवर कमिटीने तत्वतः मजूरी दिली असल्याची माहिती एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. यासाठी काही आवश्यक एनओसी मिळाल्यानंतर एमआयडीसीकडून अदानींच्या खाजगी मल्टी मेडल लॉजिस्टिक पार्कसाठीचे नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. या लॉजिस्टिक पार्कमध्ये खार्गो हबसह विमानतळ उभारणे हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.