Wild Dogs: अखेर भीमाशंकर अभयारण्यात रानकुत्रींचे दर्शन; तब्बल १९५ वर्षांनी दिसला हा प्राणी

By श्रीकिशन काळे | Published: August 27, 2024 04:18 PM2024-08-27T16:18:55+5:302024-08-27T16:19:36+5:30

रानकुत्रा असे जरी नाव असले तरी यांचा पाळीव कुत्र्याशी संबंध नसून ही श्वान कुळातील वेगळी प्रजाती आहे

Finally sighting of wild dogs in Bhimashankar Sanctuary This animal was seen after 195 years | Wild Dogs: अखेर भीमाशंकर अभयारण्यात रानकुत्रींचे दर्शन; तब्बल १९५ वर्षांनी दिसला हा प्राणी

Wild Dogs: अखेर भीमाशंकर अभयारण्यात रानकुत्रींचे दर्शन; तब्बल १९५ वर्षांनी दिसला हा प्राणी

पुणे : कळपाने राहणाऱ्या आणि वाघ, बिबट्याही ज्यांना घाबरतो, अशा रानकुत्र्यांचे दर्शन भीमाशंकर येथे झाले आहे. भीमाशंकर अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी रानकुत्र्यांची (इंडियन वाईल्ड डॉग)ची जोडी आढळली आहे. या विषयी अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांचा शोधनिबंध ‘झु’ज प्रिंट (ZOO’s Print) या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला.

निसर्ग व वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला आहुपे देवराई येथे अभ्यास दौऱ्यावर गेले असताना रानकुत्र्यांची जोडी दिसली. त्याचे फोटो काढून तसेच दुर्बीणद्वारे निरिक्षणे नोंदवली. सतत दहा महिन्यांच्या अभ्यासानंतर हा शोधनिबंध लिहिला. रानकुत्री सर्रासपणे आढळत नसून, ही दुर्मिळ घटना असून यावर शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

उमेश वाघेला, “रानकुत्री कळपात राहणारा सामाजिक मांसाहारी प्राणी आहे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या घनदाट जंगलातील मोकळ्या जागेत राहणे पसंत करतात. उन्हापासून सावली, आहारासाठी योग्य शिकार प्रजाती आणि पिण्यासाठी पाणी असेल अश्या अधिवासात ते राहतात. “रानकुत्रे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर आणि पूर्व भागात आढळून येते. वाई विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणातही याची नोंद करण्यात आली आहे. सन १८२८ साली ईस्ट इंडिया कंपनीचे कर्नल विलियम हेन्न्री साईक्स यांनी नोंदवले की ‘भीमाशंकरच्या आदिवासी रहिवाशांना रानकुत्र्यांच्या अस्तित्वाची पुरेपूर जाणीव होती,’ त्यांनी नुकतेच मृत रानकुत्रे पाहिल्याची नोंद आहे. जे जवळजवळ दोन शतकांपूर्वी त्यांच्या उपस्थिती असल्याची नोंद आहे. ही प्रजाती आता भीमाशंकर परिसरात नामशेष होत असल्याचे गिरिश पंजाबी व अन्य शास्त्रज्ञांच्याच्या सर्वेक्षण व वैयक्तिक निरिक्षणानुसार नोंदवलेले आहे. सुमारे दोन शतकानंतर भीमाशंकर परिसरातील आढळलेल्या रानकुत्र्यांचा हा पहिलाच फोटोग्राफिक पुरावा असून यावर शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.”

शोधनिबंधात ‘झुलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनिल महाबळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. ‘झुलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’चे सस्तन प्राणीशास्त्रज्ञ डॉ. श्यामकांत तळमळे यांनी रानकुत्र्यांची ओळखीला खात्री दिली. अलाइव्ह संस्थेचे रघुराज एरंडे व विश्वनाथ भागवत आणि ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे शिवराज पिंपुडे यांचे सहकार्य लाभले.

रानकुत्र्यांना कोळसून, ढोल किंवा भारतीय रानकुत्रा असेही म्हटले जाते. रानकुत्रा असे जरी नाव असले तरी यांचा पाळीव कुत्र्याशी संबंध नसतो. रानकुत्रा ही श्वान कुळातील वेगळी प्रजाती आहे. हे कळपाने राहतात. दाट झाडीमध्ये आणि मोकळ्या परिसरात वास्तव्य असते. एक वर्षभर याविषयी संशोधन झाल्यावर जर्नलमध्ये लेख प्रकाशित झाला. - उमेश वाघेला, वन्यजीव अभ्यासक

Web Title: Finally sighting of wild dogs in Bhimashankar Sanctuary This animal was seen after 195 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.