...अखेर कर्मचारी कामावर अन् लालपरी रस्त्यावर; पुणे विभागातून २५० बस सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 11:48 AM2021-12-10T11:48:01+5:302021-12-10T11:48:08+5:30
पुणे विभागातदेखील १३ पैकी ६ आगार सुरू झाले. यात शिवशाही ते साधी, परिवर्तन गाडीचा समावेश आहे. पुणे शहरात कमी, पण ग्रामीण भागात लालपरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुणे विभागात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाने पोलीस संरक्षणाची मागणीच केली नाही. पुणे विभागातील आतापर्यंत सहा आगार सुरू झाले. यात ना कर्मचाऱ्यांना ना एसटीला पोलीस संरक्षणची गरज लागली. पोलीस संरक्षण न घेताच कर्मचारी कामावर आले अन् लालपरी रस्त्यावर धावली.
पुणे विभागातदेखील १३ पैकी ६ आगार सुरू झाले. यात शिवशाही ते साधी, परिवर्तन गाडीचा समावेश आहे. पुणे शहरात कमी, पण ग्रामीण भागात लालपरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः भोर व दौंड आगारातून अधिक गाड्या धावत आहेत.
बसेस सुरू झाल्या
पुणे विभागात जवळपास सर्व प्रकारच्या बस मिळून २५० बस धावत आहेत. यात सर्वाधिक लालपरी आहेत. तर पुणे विभागात १३ आगार असून, त्यापैकी ६ आगार सुरू झाले आहेत. पुणे विभागात ९०० गाड्या असून, त्यापैकी २५० गाड्या धावत आहेत.
एक गुन्हा दाखल
काही दिवसापूर्वी भोरहून स्वारगेटला येणाऱ्या एसटीचे चालक हे दारू पिऊन गाडी चालवीत असल्याची खोटी तक्रार एका व्यक्तीने पोलिसाकडे केली. त्यानुसार पोलीस प्रशासनाने त्या संबंधित चालकाची मेडिकल टेस्ट केली. मात्र त्यात दारू पिले असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यावेळी त्या तक्रारदाराने एसटीची बदनामी केली, तसेच एसटी वाहतुकीत बाधा निर्माण केल्याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली.
लालपरीशिवाय प्रवास नाही
''एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने पूर्णक्षमतेने गाड्या सुरू झाल्या नाहीत. आता काही प्रमाणात गाड्या सुरू आहेत. ते प्रवाशांना दिलासा देणारे आहे. रस्ते प्रवास करताना मी नेहमीच लालपरीला प्राधान्य देतो असे प्रवासी राजेश जाधव यांनी सांगितले.''
''पुणे विभागात संप काळात कुठेच अनुचित घटना घडली नाही. परिणामी, एसटी प्रशासनाला पोलीस संरक्षणची आवश्यकता वाटलीच नाही. कर्मचाऱ्यांमध्येदेखील हाणामारीची घटना घडली नाही असे पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रनवरे यांनी सांगितले.''