माउली माऊली! अखेर २ वर्षांची प्रतीक्षा संपली; भाविकांना मिळणार ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात "एन्ट्री"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:47 PM2022-03-30T13:47:52+5:302022-03-30T13:48:23+5:30

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते

Finally the 2 year wait is over Devotees will get entry in Dnyaneshwar Maharaj shrine | माउली माऊली! अखेर २ वर्षांची प्रतीक्षा संपली; भाविकांना मिळणार ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात "एन्ट्री"

माउली माऊली! अखेर २ वर्षांची प्रतीक्षा संपली; भाविकांना मिळणार ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात "एन्ट्री"

googlenewsNext

भानुदास पऱ्हाड 

आळंदी : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेले माऊलींच्या समाधीचे हातस्पर्श दर्शन येत्या २ एप्रिल अर्थातच चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्यापासून सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
 
 राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. यापार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान अलीकडच्या काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. माऊलींच्या मंदिरात भाविकांना मंदिर प्रवेशवेळी एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, तोंडावर मास्क वापरणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे अशा नियमावली बंधनकारक करून मुख दर्शन दिले जात होते. मात्र भाविकांना माऊलींच्या समाधीवर डोके ठेऊन दर्शन घेण्याची आस लागून होती. 
            
यासंदर्भात देवस्थानने विशेष बैठक आयोजित करून सर्व गोष्टींचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ६ वाजल्यापासून समाधीस्पर्श दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेता येणार आहे. कोरोनामुळे सन २०२० पासून माऊलींचे समाधीस्पर्श दर्शन बंद होते. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर समाधीस्पर्श दर्शन सुरू करावे अशी मागणी वारकरी संप्रदाय तसेच राजकीय मंडळींनी मंदिर देवस्थानकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक

''गुढीपाडव्यापासून भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती माता आणि लहान बालकांनी संस्थानतर्फे सुरू असलेल्या ऑनलाइनद्वारे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केले आहे.''

Web Title: Finally the 2 year wait is over Devotees will get entry in Dnyaneshwar Maharaj shrine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.