अखेर एका मिळकतीचा लिलाव, साडेअठरा लाख रुपयांचा मिळकत कर वसुल
By राजू हिंगे | Published: February 15, 2024 02:29 PM2024-02-15T14:29:26+5:302024-02-15T14:29:51+5:30
महापालिकेने थकबाकीदारांच्या २०२ मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून ५४ कोटी रुपये थकबाकी वसूल केली जाईल
पुणे : मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून ५३ मिळकतींचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यातील केवळ एक मिळकतीची लिलावात विक्री झाली असून, त्यामधुन महापालिकेस साडेअठरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेस लिलावातून एका मिळकतीचा कर वसूल करण्यात यश आले आहे.
महापालिकेने थकबाकीदारांच्या २०२ मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. यातून ५४ कोटी रुपये थकबाकी वसूल केली जाईल. पहिल्या टप्प्यात ३२ मिळकतींच्या लिलावातून १६ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. या मिळकतींमध्ये दुकाने, कार्यालये, बंगले आदींचा समावेश आहे. थकबाकी असलेल्या मिळकतींचे मूल्यांकन करून लिलावाची किमान रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ३२ मिळकतींचे मूल्यांकन २०० कोटी इतके झाले आहे. लिलाव झाल्यानंतर महापालिका थकबाकी जमा करून घेणार आहे. उर्वरित रक्कम संबंधित जागामालकास परत केली जाईल. त्यासाठी मिळकतधारकास सहा महिन्यांच्या आत महापालिकेकडे अर्ज करावा लागेल. अर्ज न केल्यास जास्तीची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे. पालिकेने पहिल्या लिलावात ३२ मिळकती महापालिकेने विक्रीसाठी काढल्या होत्या. यात एकही मिळकत विक्री झाली नाही, तर २४ मिळकतधारकांनी महापालिकेचे पैसे भरले. त्यानंतर पालिकेने ५३ मिळकतींचा लिलाव ठेवला होता. दुपारपर्यंत त्यातील सात ते आठ जणांनी कर भरला होता. या लिलावात ४ जण सहभागी झाले होते. मात्र, त्यातील एकाच खरेदीदाराने खराडी येथील एका मिळकतीसाठी बोली लावली होती. या मिळकतीचा थकीत कर १८ लाख रुपये होता, तर विक्री मूल्य १७ लाख ८३ हजार रुपये होते. बोली १ लाख रूपये अधिक दराने लावण्यात आलेली होती. त्यामुळे महापालिकेस आपला थकीत कर वसूल करता आला असून, उर्वरित रक्कम संबधित मिळकतधारकास दिली जाणार आहे.