Satish Wagh : आमदार योगेश टिळकरांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून; पुण्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 07:51 PM2024-12-09T19:51:13+5:302024-12-09T19:58:09+5:30

आज सायंकाळी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.

Finally the body of Satish Wagh was found; Legislative Council MLA Yogesh Tilekar's maternal uncle was abducted while taking a morning walk | Satish Wagh : आमदार योगेश टिळकरांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून; पुण्यात खळबळ

Satish Wagh : आमदार योगेश टिळकरांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून; पुण्यात खळबळ

- किरण शिंदे

पुणे -पुणे  शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. सतीश वाघ यांचे आज पहाटे अपहरण करण्यात आले होते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या सतीश वाघ यांना चौघांनी जबरदस्तीने एका गाडीत बसवले आणि अपहरण केले होते. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत होते. मात्र आज सायंकाळी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.

सतीश वाघ हे हडपसरच्या मांजरी परिसरात कुटुंबीयांसह राहत होते. वाघ कुटुंबीयांचे मांजरी परिसरात लॉन्स आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शेती ही आहे. अतिशय शांत म्हणून ओळख असलेले सतीश वाघ नेहमीप्रमाणे आज पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले होते. मांजरी येथील घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतर जाताच त्यांचे अपहरण झाले होते. दबा धरून बसलेल्या चार जणांनी एका चार चाकी गाडीत त्यांना जबरदस्तीने बसवले आणि पळवून नेले होते. दरम्यान या ठिकाणी सुरू असलेला आरडाओरडा पाहून एका व्यक्तीने वाघ यांच्या कुटुंबीयांना झालेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर वाघ कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

दरम्यान, तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मांजरी परिसरातील आकाश लॉन्स याठिकाणी असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरातही अपहरणाचा हा प्रकार कैद झाला होता. चार जणांनी एका चार चाकी गाडीत जबरदस्तीने सतीश वाघ यांना बसवल्याचे दिसून आले होते. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत होते. हडपसर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती. दरम्यान सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणतीही नवीन माहिती समोर आली नव्हती. दरम्यान आता मात्र धक्कादायक माहिती समोर आली असून सतीश वाघ मृतवस्थेत सापडले आहेत. पुणे ग्रामीण परिसरातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला आहे.

या खुनाच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचे अपहरण करून खून होत असेल तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. पाच दिवसात खुनाचे पाच प्रकार घडले होते. याशिवाय घरफोड्या, हाणामारी, वाहनांची तोडफोड यासारख्या घटना सातत्याने घडत आहे. असं असताना आता अपहरण करून खून करण्यात आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यातील आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान आता पुणे पोलिसांसमोर असणार आहे.  

Web Title: Finally the body of Satish Wagh was found; Legislative Council MLA Yogesh Tilekar's maternal uncle was abducted while taking a morning walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.