Maharashtra Budget 2023: अखेर भिडे वाड्याचा प्रश्न मार्गी लागणार; अर्थसंकल्पात ५० कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 09:57 AM2023-03-10T09:57:25+5:302023-03-10T09:58:05+5:30
देशातील पहिली मुलींची शाळा भरलेला भिडे वाडा पुन्हा एकदा नव्या रूपात तीन मजली इमारतीच्या स्वरूपात उभा राहणार
पुणे : क्रांतिजाेती सावित्रीबाई फुले यांनी उभारलेल्या देशातील पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. या वाड्यासाठी ५० कोटींचा निधी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मांडल्याने हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करीत आहेत. पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनीदेखील भाडेकरूंची आणि मालकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे यांच्यासमवेत पुण्यातील निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली होती.
भिडे वाड्याच्या प्रश्नावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रश्नावर पुन्हा सुनावणी असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी १० मार्चच्या आत भाडेकरूंना रेडीरेकनर तसेच बाजारमूल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा, असे आदेश मुख्य सचिव यांच्यामार्फत पुणे महापालिका आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यामुळे भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
पालिकेने तयार केला कच्चा आराखडा
देशातील पहिली मुलींची शाळा भरलेल्या बुधवार पेठेतील भिडे वाडा पुन्हा एकदा नव्या रूपात तीन मजली इमारतीच्या स्वरूपात उभा राहणार आहे. या स्मारकाचा कच्चा आराखडा महापालिकेने तयार केला असून, यामध्ये भिडे वाड्यातील शाळेची प्रतिकृती, फुले दाम्पत्याचे पुतळे, ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृहाचा समावेश असणार आहे. स्मारकाची जागा ३२५ स्क्वेअर फूट आहे.
देशातील पहिली मुलींची शाळा येथे सुरू झाली
महात्मा जाेतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा येथे सुरू केली. या जागेचे मालक तात्याराव भिडे होते. त्यावरून या शाळेला भिडे यांचे नाव दिले होते. मात्र, या वाड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. मोडकळीस आलेल्या व अतिक्रमण झालेल्या या वाड्याचे जतन व पुनरुज्जीवन करण्याची व येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने २००६ मध्ये भिडे वाड्याची जागा राष्ट्रीय स्मारक करण्याचा ठराव मान्य केला. यानंतर २००८ स्थायी समितीने या जागेचे भूसंपादन करण्यास मान्यता दिली. भूसंपादनाचा ठराव त्याच वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाची कारवाई सुरू झाली. यासाठी महापालिकेने नुकसानभरपाई म्हणून शासनाला १ कोटी ३० लाख ५० हजार ५८ रुपये जमा केले. मात्र, येथील व्यावसायिक आणि भाडेकरू २०१० मध्ये याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
पेढे वाटून साजरा केला जल्लोष
भिडे वाड्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे भिडेवाडा येथील महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी आमदार योगेश टिळेेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेविका गायत्री खडके, गणेश कळमकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.