अखेर ‘पार्किंग बे’वरील अपघातग्रस्त विमान हटविले! पुणे विमानतळावरील विमानांचा विलंब टळणार

By अजित घस्ते | Published: June 27, 2024 05:23 PM2024-06-27T17:23:16+5:302024-06-27T17:23:56+5:30

पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला होता...

Finally, the plane crashed on the 'Parking Bay' was removed! Flight delays at Pune airport will be avoided | अखेर ‘पार्किंग बे’वरील अपघातग्रस्त विमान हटविले! पुणे विमानतळावरील विमानांचा विलंब टळणार

अखेर ‘पार्किंग बे’वरील अपघातग्रस्त विमान हटविले! पुणे विमानतळावरील विमानांचा विलंब टळणार

पुणे : गेल्या दीड महिन्यापासून पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर उभ्या असणाऱ्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाला संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत हे विमान संरक्षण खात्याच्या जागेत ‘पार्क’ करण्याची परवानगी दिली. या विमानाला हलविल्यामुळे पुणे विमानतळावरील ये-जा करणाऱ्या विमानांचा विलंब टळणार आहे.

पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला होता. शिवाय ही बे वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडत होते. या विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असल्याने विमान तात्पुरत्या स्वरुपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध होता. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत लावण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी केंद्रीय मंत्री मोहोळ यांची चर्चा झाली. अखेर संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर २४ तासांच्या आत कार्यवाही करण्याचे आदेश देत सदरील विमान संरक्षण खात्याच्या जागेत ‘पार्क’ करण्याची परवानगी दिली.

केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, अपघातग्रस्त विमान हटवल्याने याचा मोठा दिलासा पुणेकरांना मिळणार असून, कोलमडलेले वेळापत्रक पुन्हा जागेवर येईल. १० पैकी १ बे बंद असल्याचा मोठा परिमाण झाला होता. एका दिवसाला एका पार्किंग बेवर ८ ते ९ विमानांची ये-जा होत असते. मात्र, बे बंद असल्याने याचा अतिरिक्त ताण इतर ९ बेवर आला होता आणि याचमुळे वेळापत्रक कोलमडले होते. अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पार्किंग बेवर पाहणी केल्यानंतर संरक्षण खात्याच्या जागेत सदरील विमान पार्क करण्याचा पर्याय समोर आला. यावर तातडीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठविले आणि भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर २४ तासांच्या आतच ही कार्यवाही झाल्याने पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Finally, the plane crashed on the 'Parking Bay' was removed! Flight delays at Pune airport will be avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.