अखेर ‘त्यांची’ १५ वर्षांची प्रतीक्षा संपली...!; सलमान खानला भेटली ९२ वर्षांची ‘फॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 05:21 PM2018-02-10T17:21:32+5:302018-02-10T17:22:52+5:30

पुण्यात आलेल्या सलमानला भेटण्यासाठी या आजीबाई तब्बल सात तास ताटकळत उभ्या राहिलेल्या. त्यांचं सलमान खानला भेटण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं ते एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळे.

Finally, their '15-year waiting period ended ...! 92-year-old 'fan' meets Salman Khan | अखेर ‘त्यांची’ १५ वर्षांची प्रतीक्षा संपली...!; सलमान खानला भेटली ९२ वर्षांची ‘फॅन’

अखेर ‘त्यांची’ १५ वर्षांची प्रतीक्षा संपली...!; सलमान खानला भेटली ९२ वर्षांची ‘फॅन’

googlenewsNext
ठळक मुद्दे‘गनमॅन’ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांनी या आजींची सलमानशी घालून दिली भेटमी त्याच्यासाठी नेलेला केक त्याने कापला, मला खूप आनंद झाला : कलावती कल्लम

पुणे : अवघ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या सुपरस्टार असलेल्या सलमान खानला भेटण्यासाठी त्याची ९२ वर्षांची फॅन तब्बल १५ वर्षांपासून प्रतीक्षा करीत होती. त्याचा दररोज एक सिनेमा पाहण्याचा त्यांचा छंद आजही कायम जपलेला. पुण्यात आलेल्या सलमानला भेटण्यासाठी या आजीबाई तब्बल सात तास ताटकळत उभ्या राहिलेल्या. त्यांचं सलमान खानला भेटण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं ते एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळे. पुणे पोलीस दलाचे ‘गनमॅन’ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांनी या आजींची सलमानशी भेट घालून देत अनोख्या पद्धतीने शुक्रवारी वाढदिवस साजरा केला. 

कलावती सतीश कल्लम (वय ९२, रा. रास्ता पेठ) असे या आजींचे नाव आहे. कल्लम या गृहीणी आहेत. त्यांच्यावर मुलांचे आणि नातवांचे प्रचंड प्रेम आहे. कल्लम कुटुंबीयांचा केक बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय असून रास्ता पेठेमध्ये त्यांची बेकरी आहे. या बेकरीला त्यांनी ‘ग्रॅनीअम्माज केक’ असे नाव दिले आहे. कलावती यांनी १९९४ साली प्रदर्शित झालेला हम आपके है कौन? हा चित्रपट पाहिला अन् त्या सलमान खानच्या प्रेमात पडल्या. तेव्हापासून आजतागायत त्या सलमानचा एक चित्रपट दररोज पाहतात. मागील पंधरा वर्षांपासून त्यांनी सलमान खानला भेटायचा चंग बांधला होता. त्यासाठी त्यांनी काही मंत्र्यांची आणि लोकप्रतिनिधींचीही भेट घेतली होती. मात्र, सलमान हा सुपरस्टार असल्याने तुमची भेट होणार नाही असे त्यांना सांगण्यात येत होते. 

नुकतेच सलमान खान पुण्यामध्ये एका सराफी दुकानाच्या उद्घाटनासाठी आला होता. त्याला भेटण्यासाठी या आजी सात तास ताटकळत उभ्या होत्या. परंतू, प्रचंड गर्दी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. कलावती यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहून पोलीस हवालदार शैलेश जगताप यांनी त्यांची माहिती काढली. जगताप यांचे मित्र असलेल्या श्रीधर कल्लम यांची ती आजी असल्याचे त्यांना समजले. त्यांनी श्रीधर यांना बोलावून सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 

सलमानचा अंगरक्षक शेरा हा जगताप यांचा मित्र आहे. जगताप यांनी शेराशी संपर्क साधला. जगताप यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. वाढदिवसाचा गाजावाजा न करता जगताप यांनी या आजींना अनोखी भेट देण्याचे ठरविले. आजींना घेऊन जगताप, परवेझ जमादार आणि नातू श्रीधर मुंबईला रवाना झाले. संध्याकाळी फिल्म सिटीमध्ये गेल्यानंतर थेट सलमान खानची शुटींग सुरु असलेल्या ठिकाणी सर्वजण पोचले. सलमान खानने या आजीबाईंना पाहून त्यांना मिठीच मारली. त्यांच्या आपल्यावरील प्रेमाने त्याला भरुन आले. भावूक झालेल्या सलमानने आजींनी खास त्याच्यासाठी नेलेला केक कापला. आजींना स्वत: सर्वत्र फिरुन शुटींग दाखवले. हे सर्व घडत असताना आजींच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला होता. सलमान या आजींना गाडीपर्यंत सोडायला आला. त्याच्या विनम्रतेमुळे आजीबाई भारावून गेल्या होत्या. सलमानने पोलीस हवालदार शैलेश जगताप यांचे कौतुक करतानाच त्यांना धन्यवादही दिले. तरुण अभिनेता आणि वृद्ध चाहतीची झालेली भेट सर्वांसाठी अनोखी ठरली. 

कलावती आजी सलमानच्या खुप मोठ्या चाहत्या आहेत. त्यांची भेट सलमानशी घालून दिली याचा मला विशेष आनंद आहे. योगायोगाने सलमानचा अंगरक्षक माझा मित्र आहे. माज्या वाढदिवसाच्या दिवशी हा योग जुळून आला. सलमान खानने खुप अगत्याने आजींचे स्वागत केले आणि त्यांच्यासोबत वेळही घालविला.  - शैलेश जगताप, पोलीस हवालदार


मी सलमानची जबरदस्त चाहती आहे. माझे १५ वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले. सलमानला पाहून मला खूप आनंद झाला. मी त्याच्यासाठी नेलेला केक त्याने कापला. मला स्वत: सोबत घेऊन फिल्म सिटीमध्ये फिरला. पोलीस हवालदार शैलेश जगताप यांनी हा योग जुळवून आणला. मला खूप आनंद झाला आहे.  - कलावती कल्लम

Web Title: Finally, their '15-year waiting period ended ...! 92-year-old 'fan' meets Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.