...अखेर पुणे मेट्रोचे काम सुरु होणार; गणेशोत्सव मंडळांनी सुचवलेले पर्याय अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:09 PM2021-12-08T13:09:37+5:302021-12-08T13:09:56+5:30
गणेशोत्सव मंडळांनी सुचविलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ज्ञांनी दिला आहे. आता अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे विकासाच्या दृष्टीने योग्य नाही; म्हणूनच तीन महिन्यांपासून बंद असलेेले या पुलावरील मेट्रोचे काम पुन्हा सुरू करणार
पुणे : छत्रपती संभाजी महाराज पुलावरील (लकडी पूल) मेट्रोच्या कामातील बदलासाठी काही गणेशोत्सव मंडळांनी सुचविलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ज्ञांनी दिला आहे. आता अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे विकासाच्या दृष्टीने योग्य नाही; म्हणूनच तीन महिन्यांपासून बंद असलेेले या पुलावरील मेट्रोचे काम पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले की, गणेश विसर्जन मिरवणुकीला छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रो मार्ग अडथळा ठरेल, असा आक्षेप काही गणेशोत्सव मंडळांनी घेतला. त्यामुळे मेट्रोचे काम थांबवून गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, मेट्रो अधिकारी आणि तज्ज्ञांच्या तीन बैठका घेण्यात आल्या. पर्यायांची चाचपणी करण्यात आली. मात्र हे पर्याय व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष निघाला.
मोहोळ म्हणाले, ‘विकासाची कामे करीत असताना संस्कृती जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाने आजवर समाजभान जपत झालेले बदल स्वीकारले व काळानुरूप बदलत, परंपरा जपत पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने जगाच्या नकाशावर छाप उमटवली आहे़ मेट्रोच्या अर्थात शहर विकासाच्या मुद्द्यावरही कार्यकर्ते साथ देतील; तसेच मेट्रोच्या या पुलावरील कामाला विरोध न करता पुण्याच्या प्रगतीचे साक्षीदार होतील.’
#Thread | व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावरील मेट्रोचे काम सुरु होणार !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 7, 2021
छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या कामासाठी गणेशोत्सव मंडळांनी सुचवलेला पर्याय शक्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ञांकडून प्राप्त झाला असून मेट्रोने सुचवलेले पर्याय पुणेकरांना व्यवहार्य नाहीत.
अव्यवहार्य पर्याय
१) काही गणेशोत्सव मंडळांनी मेट्रो मार्ग खंडित करण्याचा पर्याय दिला. मात्र देशभरातील कोणत्याही मेट्रोने असा पर्याय कुठेही अवलंबलेला नाही. मेट्रो मार्ग सलग ठेवणे आवश्यक असते.
२) सध्या सुरू असलेल्या मेट्रो कामाची पुलावरील उंची वाढविण्यासाठी पुलाच्या आजूबाजूचे ३९ पिलर पाडून नव्याने बांधावे लागले असते. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा वाढीव खर्च झाला असता. शिवाय या कामासाठी आणखी २४ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागला असता.
३) आणखी एका पर्यायानुसार १७ पिलर पाडून नव्याने बांधावे लागले असते. त्यासाठी १८ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागला असता. शिवाय २३ कोटी रुपयांचा खर्चही वाढला असता.