Nirmala Sitharaman: त्या आल्या; पण बोलल्याच नाहीत....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:57 PM2022-09-24T12:57:04+5:302022-09-24T13:00:28+5:30
अर्थमंत्री निर्मला सीतारामण इंदापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाषण केले नाही...
इंदापूर : त्या आल्या, बुद्धवंदना केली. सभास्थानी आल्यानंतर भाषणांमधून त्यांच्याविषयी व्यक्त होत असणाऱ्या कृतज्ञतेबद्दल स्मित करून हात जोडत लोकभावनेची कदर केली. पण त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कार्यक्रम संपला. अशा प्रकारे इंदापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच दलितवस्तीत आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आजच्या दौऱ्यातील एक टप्पा संपला.
निमगाव केतकी गावाला भेट दिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इंदापूर शहरात आल्या. येथील डॉ. आंबेडकरनगरमध्ये जेतवन बुद्धविहारातील बुद्धमूर्तीचे दर्शन घ्यायचे. त्यानंतर शेजारच्या सभागृहात भाजपच्या बारामती लोकसभा प्रवास योजनेच्या अनुषंगाने दुर्बल घटकांच्या प्रतिनिधीशी संवाद साधणे व त्यानंतर ललेंद्र शिंदे यांच्या घरी चहापान करणे असा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता.
बुद्धवंदना झाल्यानंतर सभागृहात अर्थमंत्री सीतारामन यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुले मंजूर असणाऱ्या लाभार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आली. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थींना धान्याचे वाटप करण्यात आले.
सीतारामन यांच्या भाषणाची कसर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भरून काढली. ते म्हणाले की, कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नियोजन केल्यामुळे देशातील ८० कोटी गोरगरीब कुटुंबांना धान्य उपलब्ध झाले. इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात मिळवलेल्या केंद्र व राज्यस्तरावरील पुरस्काराविषयीची माहिती त्यांनी दिली.
आ. भीमराव तापकीर यांनी प्रास्ताविक केले. रिपाइंचे शिवाजीराव मखरे यांनी मनोगत व्यक्त केले. संदीपान कडवळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास कदम, शकीलभाई सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी आभार मानले.