अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घेतले मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 03:41 PM2022-09-23T15:41:00+5:302022-09-23T15:41:15+5:30
मंदिरामध्ये ब्रम्हवृन्द व पुजाऱ्यांनी निर्मला सीतारामन यांचा अभिषेक, पुजा, संकल्प करून श्रींची आरती केली
बारामती : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वर मंदीरात श्रींच्या दर्शनासाठी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आल्या होत्या. त्यांनी श्रींची अभिषेक पूजा व आरती केली. यावेळी जिल्हाभरातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यानिमित्ताने निर्मला सीतारामन हे मोरगाव येथे आल्या होत्या. त्यांनी प्रथमता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील लसीकरण केंद्र, गरोदर माता, आशा वर्कर यांची भेट घेतली. तसेच महीलांच्या बाळंतपण कक्षास भेट देऊन येथील दैनंदिन कामकाज विविध क्रेंदीय योजनांचे लाभार्थी विषयी माहीती घेतली. तसेच मोरगाव येथील जेनेरिक मेडिकलला भेट दिली. यानंतर त्या मंदिरामध्ये आल्या. यावेळी भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल शेवाळे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, कांचन कुल, अंकिता पाटील आदी उपस्थित होते.
मंदिरामध्ये ब्रम्हवृन्द व पुजाऱ्यांनी निर्मला सीतारामन यांचा अभिषेक, पुजा, संकल्प करून श्रींची आरती केली. त्यांनी मंदिराविषयीची व मंदिराच्या पुरातनते विषयीची माहिती घेतली. यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने निर्मला सितारामण यांचा सत्कार विश्वस्त विनोद पवार यांनी शाल, श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन केला.