मृत शिक्षकांच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:01+5:302021-05-24T04:09:01+5:30
केडगाव: कुटुंब कल्याण ठेव योजनेअंतर्गत अंशदान पेन्शन योजनेतील संस्थेच्या सभासदाचा सेवाकालामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना २५ लाख रुपयांचा लाभ ...
केडगाव: कुटुंब कल्याण ठेव योजनेअंतर्गत अंशदान पेन्शन योजनेतील संस्थेच्या सभासदाचा सेवाकालामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना २५ लाख रुपयांचा लाभ देणारी कर्मयोगी सुभाष अण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील पहिलीच पतसंस्था ठरली आहे.
पतसंस्थेच्या वतीने सभासदांना २५ लाख रू. कर्जवाटप योजनेचा शुभारंभ आमदार राहुल कुल यांच्या हस्ते झाला. या वेळी भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माऊली ताकवणे, शिवाजी दिवेकर, अरुण भागवत, मार्गदर्शक विकास शेलार, तैमूर शेख, सुनील चौधरी, उत्तम खोल्लम, अशोक पवार यांच्यासह सभासद उपस्थित होते.
आमदार कुल म्हणाले की, पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र नातू म्हणाले की, संस्थेचे अधिकृत भागभांडवल २० कोटी रू. करणे, संस्थेच्या सेवक वर्गास वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शिफारशीने बोनस देणे, मासिक पगारानुसार रुपये २५ लाखांपर्यंत कर्जवाटप करणे या वार्षिक सभेने व विशेष वार्षिक सभेने मंजूर केलेल्या विषयांना माननीय सहायक निबंधक दौंड यांनी मंजुरी दिली आहे.
पतसंस्थेचे ८२३ सभासद असून, ४० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. इतर सभासद मयत झाल्यास त्याच्या वारसास रू. २० लाख आर्थिक मदत देण्यात येईल. मागील आर्थिक वर्षांत संस्थेस १ कोटी ७० लाख नफा झाला असून अधिकृत भागभांडवल १४ कोटी असल्याचे व्यवस्थापक तुकाराम शेलार यांनी सांगितले.
२३ केडगाव
चौफुला येथे २५ लाख रुपये कर्जवाटप योजनेचा शुभारंभ करताना आमदार राहुल कुल, विकास शेलार व मान्यवर.