कलाकारांसाठीही आर्थिक पॅकेज जाहीर करायला हवं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:11+5:302021-04-16T04:11:11+5:30
पुणे : गेल्या मार्चपासून कोविडमुळे आधीच लोककलावंत आर्थिक संकटात सापडला आहे. उत्सव, जत्रेचा हंगाम हातातून गेलाय. चित्रपट निर्मितीवरही परिणाम ...
पुणे : गेल्या मार्चपासून कोविडमुळे आधीच लोककलावंत आर्थिक संकटात सापडला आहे. उत्सव, जत्रेचा हंगाम हातातून गेलाय. चित्रपट निर्मितीवरही परिणाम झाला असून, चित्रीकरणे देखील बंद आहेत. लोककलावंत तसेच नाट्य- चित्रपट क्षेत्रावर ज्या लोकांची पोट आहेत, त्यांना कामावर गेल्याशिवाय त्यांच्या घरातली चूल पेटणार नाही, अशी स्थिती असताना दर वेळी संचारबंदीत लोककलावंत, चित्रपट व नाट्यकलावंत यांनाच फटका का सहन करावा लागतो. सरकार इतर घटकांचा विचार करते पण कला क्षेत्राला का विसरते? असा सवाल कलावंतांनी उपस्थित केला आहे. कलावंतांचा देखील विचार करून आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कलावंतांनी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून सांस्कृतिक आणि कलाविश्व ठप्प आहे. आत्ता कुठं सर्व सुरळीत सुरू झालं होतं. आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र, कलावंतांसमोर पुन्हा रोजगाराचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील पंधरा दिवस आम्ही देखील घरात बसतो पण आम्हाला देखील आर्थिक पॅकेज जाहीर करा. ज्यायोगे थोडतरी जगणं सुसह्य होईल, अशी अपेक्षा कलाक्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
----------------
सव्वा वर्षापासून हाताला काम नाही. यात्रा, उत्सव, जत्रा, गणेशोत्सव सर्व हंगाम हातातून गेला. जेवढी पुंजी साठवली ती देखील वर्षभरात खर्च झाली आहे. आई रुग्णालयात आहे परंतु तिच्या उपचारांसाठी पैसे नाहीत. सर्व खर्च भाऊ आणि वहिनी करीत आहेत. सरकारला कला जगवायची आहे की नाही? आम्ही खूप बिकट परिस्थितीमधून जात आहोत. शासनाने इतर घटकांबरोबरच कलावंतांना देखील आर्थिक मदत करावी.
- माया खुटेगावकर, लावणी नृत्यांगना
-------------------------------------------------
शासनाने पंधरा दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. ज्यात शूटिंग, लोककलावंतांच्या कार्यक्रमांना आणि नाटकाच्या प्रयोगाला बंदी आहे, मग कलाकारांनी जगायचं कसं...?. देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीचा भाग असणारे, राज्यासह देशाला सर्वात जास्त कर देणाऱ्या या इंडस्ट्रीचा घटक असणारे हे कलाकार ,मग या कलाकारांवर सतत अन्याय का ..? मागील वर्षी आणि याही वर्षी सर्व जत्रा,यात्रा, उत्सव, लग्नसराई रद्द झाल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कडक निर्बंध लागू केले असले, तरी या काळात कमी युनिटमध्ये कोविडचे नियम पाळत चित्रीकरणाला परवानगी द्यावी आणि त्याच बरोबर कलाकारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
- बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष चित्रपट सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस
---------------------------
आत्ताच दोन महिन्यांपूर्वी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर ताकाची गाडी लावली होती. शासनाने संचारबंदी केल्यामुळे ताकाची विक्री होणार कशी? पुन्हा जगण्याचा प्रश्न समोर येऊन उभा राहिला आहे.
- गणेश माळवदकर, नेपथ्यकार
---------------------