‘आयएसआयएस’ला फायनान्स; नाशिक येथून ३० वर्षांच्या तरुणाला एटीएसकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 02:35 PM2024-01-25T14:35:17+5:302024-01-25T14:36:14+5:30
नाशिक येथून एका ३० वर्षांच्या तरुणाला एटीएसने अटक केली आहे...
पुणे : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या आयएसआयएस या संघटेनशी संबंधित परदेशी दहशतवाद्याशी संपर्कात राहून निधी पुरविणाऱ्या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणले आहे. नाशिक येथून एका ३० वर्षांच्या तरुणाला एटीएसने अटक केली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गेल्या महिन्यात पुणे, मुंबईसह देशभरात १९ ठिकाणी छापे टाकून ८ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून अनेक स्फोटके, केमिकल, गनपावडर, शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त केले होते. या कारवाईत दहशतवादी संघटनेत भारतातील तरुणांना सहभागी करून घेण्याचा कट उघडकीस आणला होता. त्याच अनुषंगाने दहशतवादविरोधी पथकाने बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एटीएसने नाशिक येथे छापा टाकून या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीत एटीएसने मोबाइल, सीमकार्ड, लॅपटॉप, पेन डाइव्ह अशी इलेक्ट्रॉनिक/डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत, तसेच घरझडतीत काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली असून, तीही जप्त केली आहेत. आरोपीच्या अन्य सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी एटीएसची पथके इतर राज्यात पाठविण्यात आली आहेत. तपासाच्या दृष्टीने एटीएसने या आरोपीचे नाव गोपनीय ठेवले आहे. या आरोपीला एटीएसने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.