भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी...
By admin | Published: December 10, 2015 01:16 AM2015-12-10T01:16:04+5:302015-12-10T01:16:04+5:30
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा
रहाटणी : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा बलुतेदार गाव सोडून शहरात दाखल होत आहेत. मात्र, या ठिकाणीही त्यांना त्यांचे काम सोडून इतर कामे करावी लागत आहेत. पारंपरिक व्यवसाय ग्रामीण भागात चालत नसल्याने अनेक कारागीर शहराच्या वाटा धरल्या. परंतु, या ठिकाणीदेखील या कामाची वानवा असल्याने अनेकांना इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. कालांतराने हे पारंपरिक व्यवसाय कालबाह्य होतात की काय, अशी शंका काही कारागीर व्यक्त करीत आहेत.
उदरनिर्वाह चालविण्यासाठी अनेकांनी गाव सोडून इतरत्र भटकंती सुरू केली. मात्र, सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने अनेकांनी शहर गाठले. मात्र, शहरात या व्यवसायांना थारा नसल्याने काहींना इतर कामे करावी लागत आहेत, तर काही जमेल तसे आपला व्यवसाय करताना दिसून येत आहेत. दिवसभर काम नाही मिळाले की, त्यांच्यावर अन्नासाठी भटकंती करण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी हे लोक पैसे मागत हिंडत असतात. काही जण गावाकडे जाण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी करत असतात. नेमके हे लोक शहरात कामासाठी येतात, पण त्यांना लवकर काम मिळत नाही. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खंगल्याने शहरातही त्यांना कामासाठी भटकावे लागते.
(वार्ताहर)