भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2016 03:02 AM2016-03-31T03:02:28+5:302016-03-31T03:02:28+5:30
दुष्काळ पडलाय... काय करायचं... दोन वेळ पोटाला अन्न मिळंना... लेकरं-बाळं उपाशी राहायची वेळ आली... त्यात कामधंदा रोज मिळंना... काम मिळालं, तर कुठंबी जावं लागतंय...
भोसरी : दुष्काळ पडलाय... काय करायचं... दोन वेळ पोटाला अन्न मिळंना... लेकरं-बाळं उपाशी राहायची वेळ आली... त्यात कामधंदा रोज मिळंना... काम मिळालं, तर कुठंबी जावं लागतंय... ठेकेदार काम करून घेतो अन् पैसे बुडवतोय... असा सूर येथील मजूर अड्ड्यावरील पाचशे ते सहाशे मजुरांचा होता. डोक्यावर घमेले, एका हातात फावडे आणि दुसऱ्या हातात दोन वेळचा जेवणाचा डबा. ज्या दिशेने कामासाठी ठेकेदार नेण्यासाठी येतील, त्या दिशेने पळत सुटणे आणि गाडीवर बसून कामाला जाणे. ज्याला काम नाही मिळत, तो घुटमळत तिथेच उभा राहतो, असे दृश्य मजूर अड्ड्यावर नित्य पाहायला मिळत आहे.
मुला-बाळांची
वाटते काळजी
भोसरी : रोज कामासाठी सात वाजताच घर सोडायला लागते. लवकर अड्ड्यावर आले, तर काम लवकर मिळते. कामासाठी आल्यानंतर हाताला काम मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. तरीही कशाची तमा न बाळगता मुला-बाळांना घरी सोडून येतो. कित्येक वेळा काम मिळाले नाही, तर रिकाम्या हाताने परतावे लागते. मिळेल ते काम करावे लागते. बांधकामावर विटा, वाळू, सिमेंट वाहण्याचे काम मिळते. कधी घरातील साफसफाई, तर कधी चेंबर साफ करण्याचेदेखील काम मिळते. कधी कधी सोसायटीमधील साफसफाईची कामे मिळतात, असे मजुरांनी सांगितले.
उंबरे झिजवूनही
मिळत नाही काम
चिखली : गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाने पाठ फिरवलीय. विहिरी आटल्या. प्यायला पाणी नाही. हाताला काम नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडावे लागल्याने पोरांनाही अर्ध्यातच शाळा सोडावी लागली. दुष्काळाच्या संकटाने अनेक कुटुंबांची वाताहत झाली. कामाच्या शोधात हे शहर गाठले. अनेकांचे उंबरे झिजवून झाले; मात्र, काम मिळेना, अशी व्यथा महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून चिखली येथे कामाला आलेल्या मजुरांनी व्यक्त केली.
मराठवाडा, विदर्भ आदी भागातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. गावाकडे काम नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी दुष्काळी पट्ट्यातील लोंढे शहरात येत आहेत. शेती, बांधकामे, कारखाने कोणत्याही ठिकाणी काम करण्याची त्यांची तयारी आहे. या मजुरीत अनेक अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, शेतकऱ्यांचा समावेश
आहे. दुष्काळामुळे अनेक शाळकरी मुलांवर अर्ध्यावरच शाळा सोडून मजुरी करण्याची वेळ आली आहे. काही ज्येष्ठ नागरिक व महिलांना काम होत नसतानाही पोटासाठी उतारवयात काम करण्याची वेळ आली आहे.
पदवीधर तरुणही
कामाच्या प्रतीक्षेत
काळेवाडी : मजूर अड्ड्यावर जाताच काम मिळेल, या अपेक्षेने गर्दी झाली. बाया-माणसांचा घोळका जमला. काय काम आहे, रोज काय मिळेल, यासाठी एकच गलका उडाला. सकाळीच सात-आठ वाजेपासूनच या मजूर अड्ड्यावर महिला व पुरुष जमतात. १७-१८ ते वयाची साठी गाठलेल्या व्यक्ती दिसतात. काहींची शिक्षण जेमतेम तर काही पदवीधरसुद्धा आहेत.
जेवढ्या लवकर येणार, त्यावर दिवसाचा रोज मिळणार म्हणून अड्ड्यावर येण्याची घाई. साधारणत: दिवसाचे २००चे ४०० रुपये रोज मिळतो. त्यात रोजच काम मिळेल, याची काही शाश्वती नाही. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असते. सेंट्रिंग काम, घरगुती काम, खड्डे खोदायचेत, पाणी भरायचंय, जागा सफाई, गवत कापणी यांसारख्या कोणत्याही कामासाठी ही माणसं तयार आहेत. गावात नाही, तर शहरात तरी काम मिळेल, या आशेने शहरात गावाकडून लोंढेच्या लोंढे येत आहे.
तंदुरुस्त व्यक्तींनाच कामासाठी जादा मागणी
रहाटणी : डांगे चौकातील मजूर अड्ड्यावर सकाळी आठच्या सुमारास डबे घेऊन दुष्काळग्रस्त भागातील विविध ठिकाणांहून आलेल्या नागरिकांची गर्दी सुरू होती. यामध्ये युवकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत समावेश दिसून आला. थोड्या वेळाने महिलाही हातात डबे घेऊन मजूर अड्ड्यावर दाखल झाल्या होत्या. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील काशिनाथ नाईक यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात संक्रांत झाल्यानंतर पत्नी व एका मुलाला घेऊन मी कामाच्या शोधासाठी एका मित्राच्या मदतीने आलो. गावाकडे यंदा पिण्यासही पाणी नाही.
मजूर अड्ड्यावर दुचाकीवर एक व्यक्ती आली. त्याने हिंजवडीत बांधकामाच्या ठिकाणी विटा उचलण्यासाठी मजूर पाहिजे असल्याचे तेथील कामगारांना सांगितले. कामासंदर्भात त्या व्यक्तीची चर्चा सुरू असतानाच त्या व्यक्तीच्या आजूबाजूला १५ ते २० जणांनी काम मिळण्यासाठी गर्दी केली.
मात्र, त्या व्यक्तीने त्या गर्दीमधील शरीराने
तंदुरुस्त असलेल्या पाच तरुणांनाच सोबत घेतले व उर्वरित नागरिकांना उद्या कामावर बोलावतो, असे सांगून गेला.
महिलांना काम मिळणे अवघड
मजूर अड्ड्यावर पुरुषाप्रमाणेच महिलावर्गाचीही गर्दी होती. अंदाजे २५ ते ३० महिला हातात डबे घेऊन कामाच्या शोधात उभ्या होत्या. मात्र, ठेकेदार मंडळी कामाच्या ठिकाणी पुरुषांनाच जास्त प्राधान्य देत असल्यामुळे महिलांना कमी प्रमाणात काम मिळत आहे. काही महिलांना काम मिळते, तर काही महिलांना परत घरी जावे लागते आणि काम मिळालेच, तर आठवड्यातून दोन-तीन दिवसच मिळत असल्याचे काही महिलांनी सांगितले.
गेल्या वर्षभरापासून इथे आहे. या आधी सेंट्रिंग कामाचा अनुभव नव्हता. गावाकडे काम नाही म्हणून शहरात आलोय. आमचं पूर्ण कुटुंब इथे आहे. मिळेल ते काम करण्याची तयारी आहे. रोज बुडला तरी रोजच्या जेवणाचा प्रश्न पडतो.
- इंदुमती मठपती
प्रत्येक दिवसाला काम मिळेलच, असे नाही. आठवड्यातून काही दिवस काम नसते. गावाकडे पाणी नाही, असलेल्या शेतजमिनीत उपज नाही. पोटासाठी दोन वेळचं लागतंच. त्यामुळे काम मिळालंच पाहिजे.- उषा माने, सातारा
सध्या भोसरी चक्रपाणी वसाहतीत भाड्याच्या खोलीत मी राहत आहे. ठेकेदार आम्हाला कामाला घेऊन जातो आणि आमचे पैसे बुडवतो. - वर्षा देवगिरे, भिगवण
सध्या मी मोशीमध्ये राहत आहे. गवंडीकाम करते. ५-६ मजले चढून आम्हाला वाळू वाहण्याचे काम करावे लागते. कधी-कधी पोटात नुसता गोळा उभा राहतो. - द्वारकाबाई झाडे, बीड
लोकमत टीम : नीलेश जंगम, सुवर्णा नवले, सचिन देव, किरण माळी, अतुल मारवाडी