मतदारयादीत नाव शोधणे सुलभ
By admin | Published: August 27, 2014 05:25 AM2014-08-27T05:25:55+5:302014-08-27T05:25:55+5:30
मतदारयादीत नाव शोधणे किचकट काम आहे. संगणक व इंटरनेटशिवाय पर्याय नाही. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडी जर चूक असेल, तर नाव शोधताना नाकी नऊ येते
मिलिंद कांबळे, पिंपरी
मतदारयादीत नाव शोधणे किचकट काम आहे. संगणक व इंटरनेटशिवाय पर्याय नाही. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडी जर चूक असेल, तर नाव शोधताना नाकी नऊ येते. आता संगणक व इंटरनेटविना नाव शोधता येणार असून, काही सेकंदांत हातात स्लिप मिळणार आहे. व्होटर्स सर्च मशिन सौर ऊर्जेवर चालत असल्याने विजेची गरज भासत नाही.
येथील मानव सेवा विकास ट्रस्ट या सामाजिक संस्थेने एटीएमसारखे दिसणारे हे मशीन प्रायोगिक तत्त्वावर विकसित केले आहे. एका स्टॅँडवर टच स्क्रीन वापरून हे तयार केले आहे. निवडणूक आयोगाचा मतदारयादीचा डेटा, हॉर्डवेअर व थर्मल प्रिन्टरचा छोटा बॉक्स खाली आहे.
लोकसभा निवडणुकीत याद्यामध्ये घोळ झाल्याने राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना मतदान करता आले नाही. मतदानाच्या दिवशी यादीत नाव नसल्याचे अनेकांना समजले. त्यामुळे गोंधळ उडाला होता. मतदान न करता अनेकांना नाराज होऊन घरी परतावे लागले. यावर पर्याय म्हणून या यंत्राकडे पाहता येईल.
संस्थेचे दीड महिना या मशीनवर संशोधन केले. नुकतेच ते तयार झाले आहे. संकल्पना ट्रस्टचे अध्यक्ष संतोष इंगळे व उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी यांची असून, सॉफ्टवेअरसाठी उदय फडके याचे साह्य लाभले. मतदारसंघात यंत्र फिरवून अधिकाधिक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येऊ शकेल. यादीत नाव नसणाऱ्या व्यक्तीस मशीनमध्येच नोंदणीचे अर्ज दाखल करण्याची सुविधा विकसित करणार आहे.