पाणीसंकटामुळे पर्याय शोधावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 03:55 AM2018-12-15T03:55:58+5:302018-12-15T03:56:12+5:30
नागरिकांमध्ये आतापासूनच धास्ती; हॉटेल व्यावसायिकांना अधिक त्रास
पुणे : पुढील काही दिवसांमध्ये पुणेकरांनापाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार पुणेकरांना दररोज ६३५ एमएलडी (दशलक्ष घनलिटर) एवढाच पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढणार असून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे कशा पद्धतीने नियोजन करायचे, हा प्रश्न त्यांना भेडसावेल.
या सगळ्या परिस्थितीवर पुणे लोकमत टीमच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यात काही नागरिक, हॉटेल व्यावसायिक यांच्याशी संवाद साधण्यात आला. पाणीकपातीमुळे वसतिगृहांतील पाणीवापरावरदेखील मोठ्या प्रमाणात बंधने येणार असल्याचे दिसून आले आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत पडणार भर
पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात होणार असल्याने हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणींत भर पडणार आहे. शासनासोबत असोसिएशन म्हणून आम्ही पाणी विषयावर भांडू शकणार नाही; मात्र ते जपून व काटकसरीने वापरण्याचा प्रयत्न करू. याबाबत सर्व हॉटेलचालक व असोसिएशन सभासदांना आम्ही पेनकार्ड दिले आहे. यासोबतच ग्राहकांना सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांनी मागितल्याशिवाय पाणी देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. ग्राहकांच्या ग्लासमध्ये शिल्लक राहिलेले पाणी हॉटेलबाहेर ठेवलेल्या बॅरलमध्ये टाकण्यात येणार असून त्याचा वापर फरशी पुसण्यासाठी व झाडांसाठी केला जाईल. वास्तविक, पाणीकपातीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे.
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन
अभ्यासावर होतो परिणाम
पाणीकपातीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणाकरिता विविध ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहतात. त्यांचे वेळेचे नियोजन ठरलेले असते. पाणीकपातीमुळे आणि पाणी येण्याच्या वेळेमध्ये फरक पडतो. यामुळे सकाळी जमतेम तीन तास कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे पाणी भरून आणि प्रातर्विधी उरकून वाचनालयात किंवा महाविद्यालयात जाण्याकरिता विद्यार्थ्यांना उशीर होतो. याचा परिणाम अभ्यासावर होतो.
- सुशील शिंदे, विद्यार्थी
ग्राहकांना पाणी जपूनच द्यावे लागते
दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असेल, तर नक्कीच पाण्याची कमतरता जाणवेल आणि सध्याही ते जाणवत आहे. त्यासाठी ग्राहकांना पिण्याचे पाणी जपूनच द्यावे लागते आणि पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही टँकरचा पाण्याचा वापर करतो.
- हॉटेल रूपाली (फर्ग्युसन रस्ता)
नियोजन कसे करायचे?
जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे पुणे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाणी कसे वापरायचे, याचे नियोजन करावे लागणार आहे. कारण सद्य:स्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून २० टक्के पाणीसाठा कमी आहे. पुढील सहा महिने पाणी पुरवण्यासाठी त्याचा जपून वापर करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी पाणी वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तरच, ऐन उन्हाळात नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरेल. अन्यथा, पुणे शहराला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
...तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल
ग्राहकांना पाणी विचारूनच देतो. पाणी दिल्यास तेही अर्धा ग्लासच देण्यात येते. यामुळे सध्यातरी पाणी पुरवूनच वापरतो. स्वच्छतेसाठी बोरिंगच्या पाण्याचा वापर करतो. मात्र, दोन दिवसाआड पाणी येणार असेल, तर आम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. - हॉटेल वाडेश्वर
पाण्याचा पुनर्वापर केला जातो
सोसायटीमध्ये बोअरवेलचे पाणी येत असल्याकारणाने पाणी समस्या कधीच जाणवली नाही. परंतु, सोसायटीत दिवसांतून दोन वेळा पाणी सोडण्यात येते. याशिवाय, पाण्याचा पुनर्वापर देखील केला जातो. - विशाल ओझा (नागरिक, मार्केट यार्ड)
कर्मचाऱ्यांना दिल्या पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना
ग्राहकांनी सांगितल्याशिवाय पाणी देत नाही. तसेच, पेपरच्या छोट्या ग्लासमध्ये पाणी दिले जाते. हॉटेलमध्ये ग्लासातील पाणी अर्धवट प्यायल्यानंतर बाकीचे पाणी फेकून देतात; परंतु आम्ही उरलेल्या पाण्याचा वापर झाडांसाठी अथवा ग्लास धुण्यासाठी करतो. इतकेच नाही, तर आमच्या कर्मचाºयांनाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. -स्वप्निल गंगवाल (चहा स्टॉल, एफ सी रोड)
घरात पाणी नसल्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांचा उपयोग
घरात वापरण्याचे पाणी मिळत नाही. घरात जरी पाणी आले तरी पाण्याचे दाब खूप कमी असतो. सकाळी ५ ते१० या वेळेत पाणी येते; मात्र फार कमी दाबाने पाणी सोडले जाते. घरात शौचालय असून केवळ पाणी नसल्याकारणाने सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो.
- लक्ष्मी सुपेकर (रहिवासी, पौड फाटा)