पोपटाला पिंजऱ्यात कोंडल्याने २५ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 09:51 PM2020-01-30T21:51:24+5:302020-01-30T21:58:58+5:30
दहा झाडे लावण्याची शिक्षा : वन विभागाने केली होती कारवाई
लोणावळा : खंडाळ्यातील एका रिसॉर्टमध्ये देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवला होता. याची माहिती वन विभागाला कळताच त्यांनी तत्काळ याची दखल घेत एकावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वनरक्षक गणेश झिरपे यांनी फिर्याद दिली आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पी. टी. गिरिमोहन असे आरोपीचे नाव असून आरोपीने स्वत:च्या खंडाळा मिस्टिका रिसॉर्टमध्ये एक देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवला होता. ही माहिती वन विभागास कळताच वन विभागाने सदर रिसॉर्टमध्ये छापा टाकून पिंजरा व पोपट ताब्यात घेतला. सदर गुन्ह्याबाबत आरोपीवर गुन्हा नोंदवला होता. २०१८ मध्ये ही घटना घडली होती. या गुन्ह्याबाबत आरोपी पी. टी. गिरिमोहन याच्यावर वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. मुळीक यांनी आरोपीला २५ हजार रुपये दंड व आठ फुटी उंचीची दहा झाडे लावण्याची शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याचा तपास वनपाल एम. व्ही. सपकाळे यांनी केला आहे. वन्य प्राण्यांना अशाप्रकारे बंदी बनविल्याच्या घटना कोठे घडत असल्यास सदर गुन्ह्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन मावळ वासीयांना वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी केले आहे. देशी पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करणे, भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.