पुणे शहरातील 'या' टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास होणार ५०० रूपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:37 AM2020-12-26T11:37:49+5:302020-12-26T11:38:53+5:30
वन विभाग उचलणार पाऊल; स्वच्छ टेकडीसाठी प्रयत्न
पुणे : म्हातोबा टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्या उचलण्याचे काम काही नागरिक व लहान मुले करीत आहेत. या प्लास्टिक पिशव्यांमुळे टेकडीवरील जैवविविधता नष्ट होत आहे. त्यामुळे टेकडीवर प्लास्टिक पिशव्यांची बंदी करून जो कोणी ते टाकताना दिसेल, त्यांना ५०० रूपये दंड करण्याचा विचार वन विभाग करत असून, त्यासाठी फलकही लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्लास्टिक पिशव्या टेकडीवर पडल्याने त्या मातीत जात आहेत. त्या नष्ट होत नसल्याने तशाच पडून राहतात. परिणामी टेकडीवरील जैवविविधतेला धोका पोचतो. हा विचार करून स्थानिक नागरिक आभा भागवत त्यांचा मुलगा तुहिन, ओजस हे येथील प्लास्टिक पिशव्या जमा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कितीतरी किलो प्लास्टिक संकलित केले आहे. अनेक नागरिक टेकडीवर वृक्षारोपण करतात, त्या रोपांच्या पिशव्या तशाच त्या ठिकाणी टाकतात. तो कचरा तसाच पडून राहतो.
या विषयी वन परीक्षेत्र अधिकारी दीपक म्हणाले,‘‘टेकडीवर प्लास्टिक पिशव्या टाकू नये म्हणून आम्ही ५०० रूपये दंड करण्याचा विचार करत आहोत. तसेचही प्लास्टिकवर बंदीच आहे. त्यामुळे टेकडीवरही कोणी प्लास्टिक टाकताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या विषयी टेकडीवर फलक लावण्याचाही विचार आहे.’’
टेकडीवर अनेक नागरिक प्लास्टिक पिशव्या टाकतात. त्या आम्ही संकलित करून संबंधित यंत्रणेला देत आहोत. आताही आम्ही प्लास्टिकच्या जाळ्या जमा केल्या आहेत. त्या खूप जास्त असून, वन विभागाकडून त्या हलविण्यात येणार आहेत. हे प्लास्टिक मातीत रूतत असल्याने येथील मातीही खराब होत आहे.
- आभा भागवत, स्थानिक नागरिक