विनामास्क फिरणाऱ्यांकडून १८ कोटी ६४ लाखांची दंडवसूली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:45+5:302020-12-30T04:14:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्यानंतर लोकांना ‘मास्क’ वापरणे प्रशासनाने बंधनकारक केले. सप्टेंबर महिन्यापासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्यानंतर लोकांना ‘मास्क’ वापरणे प्रशासनाने बंधनकारक केले. सप्टेंबर महिन्यापासून रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईत गेल्या पाच महिन्यांत एकट्या पुणे जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक लोकांवर कारवाई झाली. यातून १८ कोटी ६४ लाख ९० हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली.
लोकांनी मास्क घालावा याबाबत जनजागृती करत दंडवसुली करण्याऐवजी मास्क न घालणारी व्यक्ती दिसल्यास ‘कसा भेटला बकरा’ या अविर्भावात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पोलीस आणि प्रशासनाला सापडलेला ‘महसुल’ गोळा करण्याचा नवा मार्ग पोलिस आणि प्रशासनाला सापडल्याचे यातून जाणवत आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यांत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडाला. गेल्या दहा महिन्यांत ही संख्या ३ लाख ६१ हजारांवर जाऊन पोहचली. यात तब्बल 8 हजार 785 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ८३७ एवढी आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ९ कोटी ८३ लाखांचा दंड पुणे शहरातून वसूल करण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामीण भागात २ लाख ३२ हजार ३५० लोकांवर कारवाई करत ५ कोटी २० लाखांचा व पिंपरी चिंचवड शहरातून ९० लाख ५० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
चौकट
अशी झाली कारवाई
किती जणांवर कारवाई दंडाची रक्कम (रुपये)
पुणे : २ लाख ४ हजार ४४४ ९ कोटी ८३ लाख ५३ हजार
पिंपरी-चिंचवड : ६६ हजार ५६६ ९० लाख ५५ हजार
पुणे ग्रामीण : २ लाख ३२ हजार ३५० ५ कोटी २० लाख ४८ हजार