रेनकोटची निविदाप्रक्रिया पूर्ण करा

By admin | Published: July 26, 2016 05:30 AM2016-07-26T05:30:15+5:302016-07-26T05:30:15+5:30

शाळा सुरू होऊन महिना उलटला, तरी अद्याप महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व रेनकोट न मिळाल्याप्रकरणी नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या

Finish Raincoat Process | रेनकोटची निविदाप्रक्रिया पूर्ण करा

रेनकोटची निविदाप्रक्रिया पूर्ण करा

Next

पुणे : शाळा सुरू होऊन महिना उलटला, तरी अद्याप महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व रेनकोट न मिळाल्याप्रकरणी नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना येत्या दहा दिवसांत पालिका प्रशासनाने गणवेश पुरवावेत. तसेच रेनकोटची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, ती तातडीने पूर्ण करावी, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले.
महापालिकेच्या विद्यार्थ्यांना गणवेश व रेनकोट मिळाला नसल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेचे नगरसेवक रेनकोट घालून सभागृहात आले होते. शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका करीत गणवेश व रेनकोट कधी मिळणार, याची विचारणा सभासदांनी केली.
शिक्षण मंडळ प्रमुख शुभांगी चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण करताना सांगितले, ‘‘आतापर्यंत साडेतीन हजार गणवेश ठेकेदाराकडून मिळाले असून, संध्याकाळपर्यंत १२ हजार गणवेश उपलब्ध होणार आहेत. रेनकोटसाठी निविदाप्रक्रियेत सहभागी झालेल्या ठेकेदारांच्या सॅम्पलचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने याची फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.’’
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘शिक्षण मंडळाच्या कारभाराबद्दल सदस्यांच्या भावना प्रशासनाने लक्षात घेतल्या आहेत. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.’’
सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले, ‘‘शिक्षण मंडळ पूर्ण बदनाम झाले आहे. मंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयाला तहकुबी देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडेच याला जबाबदार आहेत.’’
विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘निविदा खुल्या करण्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला. गणवेश प्रकरणात निविदेच्या अटी बदलण्यात आल्या, हे स्पष्ट दिसते आहे.’’ रूपाली पाटील म्हणाल्या, ‘‘शिक्षण मंडळाच्या कामाची हीच पद्धत चालू राहिली, तर उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट मिळतील. स्मार्ट प्रकल्पासाठी एका दिवसात वर्कआॅर्डर निघाली, तर विद्यार्थ्यांसाठी याच वेगाने कामे का होत नाहीत.’’

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन रेनकोटच्या निविदेस विलंब होत असल्याची चर्चा झाली व त्यातून शिक्षण मंडळाच्या सर्व कारभाराचे वाभाडेच नगरसेवकांनी काढले. मनसेच्या राजेंद्र वागसकर यांनी त्या बातमीमुळे मंडळात काय सुरू आहे ते समजले,असा उल्लेख केला. आयुक्त स्मार्ट सिटीच्या कामात गुंतल्यामुळे निविदेस विलंब, असा बातमीतील उल्लेखही नगरसेवक किशोर शिंदे, रूपाली पाटील यांनी सभागृहात वाचून दाखविला.

रेनकोटच्या निविदा प्रक्रि येस उशीर का झाला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी अस्मिता शिंदे यांनी केली. शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षांत दिल्या गेलेल्या साहित्याचा आढावा घेण्यात यावा, असे माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

Web Title: Finish Raincoat Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.