आंदाेलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:20 PM2019-04-02T12:20:55+5:302019-04-02T12:21:01+5:30
विद्यापीठाने आंदाेलन करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांच्या विराेधात चतुश्रुंगी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने रिफेक्टरीबाबत नवीन नियमावली तयार केल्याने विद्यार्थ्यांनी त्या विराेधात काल आंदाेलन केले. आंदाेलनाच्या वेळी विद्यार्थी आणि विद्यापीठाचे सुरक्षारक्षक यांच्यात धक्काबुक्की झाली. विद्यापीठाने आंदाेलन करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांच्या विराेधात चतुश्रुंगी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान विद्यापीठाने गुन्हेे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी विद्यार्थी धरणे आंदाेलन करणार आहेत.
विद्यापीठाने रिफेक्टरीबाबत नवीन नियामावली तयार केली हाेती. या नियमावलीचे परिपत्रक रिफेक्टरीजवळ लावण्यात आले हाेते. यात एका थाळीत दाेन विद्यार्थ्यांनी जेवू नये तसेच मासिक पास नसलेल्या विद्यार्थी आणि इतरांनी रिफेक्टरीमध्ये न जेवता विद्यापीठातील इतर ठिकाणी असलेल्या कॅन्टिन आणि हाॅस्टेलमध्ये जेवण करावे असे सांगण्यात आले हाेते. त्याचबराेबर रिफेक्टरीमधील टीव्ही काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले हाेते. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने त्याचा भार अधिक हाेत असून जेवण चांगल्या दर्जाचे देता यावे यासाठी हे नियम केले असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले हाेते. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नाेंदवला हाेता. खेड्यातील विद्यार्थ्यांना अनेकदा मासिक पासचे पैसे भरणे शक्य नसल्याने ते एकवेळचे पैसे भरुन जेवण करतात. तर काही विद्यार्थ्यांना एकट्याला थाळी संपवणे शक्य नसल्याने दाेघांमध्ये खात असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच ज्यांच्याकडे मासिक पास नाही त्यांना रिफेक्टरी मध्ये येऊ देखील दिले जात नसल्याचा आराेप विद्यार्थी करत आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. त्याबाबत त्यांनी वारंवार तक्रार केली हाेती. परंतु त्याकडे गांभिर्याने पाहिले गेले नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. काल विद्यार्थ्यांनी या नवीन नियमांच्या विराेधात आंदाेलन केले. त्यावेळी विद्यार्थी आणि सुरक्षारक्षक यांच्यात धक्काबुक्की झाली. आंदाेलन करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
काही विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती भोजनालयात दंगा घातला. त्यांनी सुरक्षरक्षकांना धक्काबुक्की केली. मासिक सदस्य असलेले विद्यार्थी जेवत असताना मध्यवर्ती भोजनालय बंद पाडत त्यांना बाहेर काढले. या वेळी धुडगूस घालणाऱ्या विद्यार्थ्यांनी टेबले उचलून फेकली आणि काचाही फोडल्या. काही विद्यार्थ्यांनी बंदोबस्तावर असलेल्या महिला सुरक्षारक्षकांनाही धक्काबुक्की केली. तसेच, या प्रकारात एका सुरक्षा अधिकाऱ्याला इजाही झाली आहे. असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना भोजनाची चांगली सुविधा देता यावी, यासाठी मध्यवर्ती भोजनालयात नियमित मासिक सदस्यांनाच भोजन उपलब्ध करून दिले जाईल. इतर विद्यार्थी व अभ्यागतांना वसतिगृह क्र. ८, ९ येथील भोजनालये, मुलींसाठी त्यांच्या वसतिगृहातील भोजनालय तसेच, आवारातील तीन कॅन्टिन येथील व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना चांगली सुविधा देता यावी यासाठीच हे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत सहकार्य करावे. याबाबत विद्यार्थ्यांचे काही आक्षेप असल्यास त्यांनी ते भोजनालय समितीकडे सनदशीर पद्धतीने नोंदवावेत. असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.