राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष टकले व हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:16 PM2018-11-05T16:16:49+5:302018-11-05T16:17:27+5:30
पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर लक्ष्मण टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या विरुद्ध खोटी बिले सादर करुन ५० लाख रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे : पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर लक्ष्मण टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या विरुद्ध खोटी बिले सादर करुन ५० लाख रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आऱ आऱ भळगट यांनी नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गोरखनाथ सोमनाथ भिकुले(रा़ भवानी पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
राष्टीय तालीम संघचे अध्यक्ष दामोदर दोडके असून योगेश दोडके विश्वस्त आहेत़. राष्ट्रीय तालीम संघाने पुणे महापालिकेच्या सहकार्याने महापौर कुस्ती स्पर्धेचे २०१६ मध्ये आयोजन केले होते़. ही स्पर्धा खराडी येथे पार पडली होती़ या स्पर्धेसाठी महापालिकेने १ कोटी ८३ लाख ४ हजार २१४ रुपये खर्च केला होता़. त्यातील १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश पुणे महापालिकेने राष्ट्रीय तालीम संघाला निधी स्वरुपात दिला होता़. त्या रक्कमेपैकी तालीम संघाच्या विश्वस्तांनी संगनमत करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तालीम संघाच्या कुठल्याही सभासदांना विश्वासात न घेता तसेच कुठलीही सर्वसाधारण सभा न घेता, कुठलाही ठराव न करता बेकायदेशीरपणे परस्पर आपापसात संगनमत करून बनावट बिले तयार करून लाखो रुपयांची रक्कम काढली आहे.
याबाबतची लेखी तक्रार पुणे मनपा आयुक्तांना देखील करण्यात आली होती. मात्र, तालीम संघाच्या सभासदांचा व मनपाची फसवणूक केली असल्याने विश्वस्तांवर कारवाईची मागणी करण्यात येत होती.हे प्रकरण तालीम संघाचे माजी सरचिटणीस गोरखनाथ भिकुले यांनी समोर आणले आणि कारवाई करण्याची मागणी केली. परंतु कारवाई होत नसल्याने अखेर तालीम संघाच्या सभासदांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के करीत आहेत.