म्हाडा अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल
By Admin | Published: June 21, 2015 12:27 AM2015-06-21T00:27:09+5:302015-06-21T00:27:09+5:30
म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन पिंपरी न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले.
पिंपरी : म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन पिंपरी न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले. न्यायालयाची प्रत प्राप्त होताच, संत तुकारामनगर पोलीस चौकीत सहायक पोलीस निरीक्षक मट्टामी यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. म्हाडाच्या संत तुकारामनगर येथील गृहसंकुल योजनेत अर्ज केला. सदनिकेची सोडत लागली असताना, अर्ज रद्द करून ती सदनिका दुसऱ्यास देण्याची प्रक्रिया केली. त्यास आक्षेप घेणारा अर्ज प्रवीण बाबूराव सूर्यवंशी यांनी पिंपरी न्यायालयात दाखल केला होता. त्या अर्जाची दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
म्हाडाने २०१०मध्ये संत तुकारामनगर येथे बांधलेल्या बैठ्या घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागविले. अर्जदारांकडून सदनिकेच्या एकूण किमतीपैकी दहा टक्के रक्कम जमा करून घेतली. त्यानंतर सोडत काढली. सोडत काढून सदनिकांचे वितरण करण्याचे निश्चित झाले. प्रवीण सूर्यवंशी यांनी २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा धनादेश म्हाडाच्या कार्यालयाकडे जमा केला. उर्वरित रक्कम बँकेतून कर्ज स्वरूपात घेऊन भरावयाची तयारी केली असताना, म्हाडाने तुमच्या नावे अन्य ठिकाणी सदनिका असल्याने तुमचा अर्ज रद्द केला असल्याचे कळविले. याबद्दल सूर्यवंशी यांनी म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन १७ जूनला पिंपरी न्यायालयाने सीआरपीसी कलम १५६(३) नुसार हे प्रकरण पिंपरी पोलिसांकडे पाठविले. संत तुकारामनगर पोलीस चौकीत या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला असल्याचे सांगितले.
दरम्यान, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध या प्रकरणी कसलाही गुन्हा दाखल नसल्याचे लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे. प्रवीण सूर्यवंशी यांनी म्हाडाविरोधात मनाईसाठी दावा दाखल केला आहे. या दिवाणी दाव्यातील सूर्यवंशी यांचा मनाईचा अर्ज ४ फेब्रुवारी २०१४ला पिंपरी दिवाणी न्यायालयाने रद्द केला आहे. हा अर्ज रद्द केल्याने सूर्यवंशी यांनी दिवाणी न्यायालय पुणे येथे अर्ज केला असून, त्याची सुनावणी २९ जूनला होणार आहे, असे म्हाडाचे तत्कालिन मुख्याधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)