बोगस मतदान करणाऱ्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 09:47 PM2019-04-23T21:47:23+5:302019-04-23T21:48:54+5:30
पुणे शहरात विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : पुणे शहरात विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीपत्नीच्या अगोदरच सकाळी आठ वाजण्यापूर्वीच कोणीतरी मतदान करुन गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दोघा अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिनेश भुवनेंद्र अगरवाल (वय ४७, रा़ गंगाधाम सोसायटी, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल व त्यांच्या पत्नी राधा यांचे मतदान बिबवेवाडीतील पंचदीप भवन येथे होते. ते आपल्या पत्नीसह सकाळी ८ वाजताच मतदान करण्यास पोहचले. तेव्हा तेथील मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना दोघा पतीपत्नींच्या नावावर अगोदरच कोणीतरी मतदान करुन गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील प्रिसायडिंग अधिकारी पंडित यांची भेट घेतली. त्यांनी पडताळणी केली तेव्हा त्यांनीही दुसऱ्याच कोणी तरी मतदान करुन गेल्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांना टेंडर मतदान करु देण्यात आले. त्यानंतर त्यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.