युवकाला गंभीर आजार हाेण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हाॅस्पिटलवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:10 PM2019-01-23T22:10:35+5:302019-01-23T22:12:07+5:30
वेदना कमी होण्यासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे गंभीर आजार होऊन त्यामुळे झालेल्या वेदना तसेच मानसिक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी खराडी येथील कोलंबिया एशिया रुग्णालयाच्या दोन डाँक्टर व ब्रदरसह रुग्णालय प्रशासनावर चंदननगर पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.
विमाननगर : वेदना कमी होण्यासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे गंभीर आजार होऊन त्यामुळे झालेल्या वेदना तसेच मानसिक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी खराडी येथील कोलंबिया एशिया रुग्णालयाच्या दोन डाँक्टर व ब्रदरसह रुग्णालय प्रशासनावर चंदननगर पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी करणजितसिंग भट्टि( वय २७,रा.महालक्ष्मी विहार,विश्रांतवाडी) याने तक्रार दाखल केली आहे.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, करणजितसिंग हा विमाननगर येथील बीपीओ कंपनीतील काम करत होता.१२ जुलै २०१८ रोजी आँफिसमध्ये पायरीवरुन घसरुन पडल्यामुळे त्याच्या पाठिला व कंबरेला इजा झाली होती. आँफिसमधील सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी खराडी येथील कोलंबिया एशिया हाँस्पिटल येथे आणले. याठिकाणी हजर असणाऱ्या डाॅ.सुवर्णा भाले व डाॅ.अझर लखानी यांनी करणजितच्या वेदना कमी होण्यासाठी मदतनीस ब्रदर एपरापटनान कहाय याला एक इंजेक्शन देण्यास सांगितले. करणजितला इंजेक्शन दिल्यानंतर डाँक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या. त्यानंतर करणजितचे पालक त्याला घेऊन घरी गेले. दोन दिवसांनंतर करणजित याला इंजेक्शनमुळे कमरेला मोठी गाठ येऊन प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यामध्ये इंनफेक्शन होऊन गंभीर आजार झाला. त्याच्या पालकांनी त्यावर एका खाजगी रुग्णालयात तीन महिने उपचार केले.त्यासाठीं सुमारे दिड लाख रुपये खर्च झाला. यासर्व प्रकरणात करणजितची नोकरी देखिल गेली.
या गंभीर प्रकरणी करणजितच्या पालकांनी चंदननगर पोलिसांकडे दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी ३१ जुलै २०१८रोजी तक्रार अर्ज केला होता. चंदननगर पोलिसांनी याबाबत ससून रुग्णालयाच्या तज्ञ समिती कडून अहवाल मागवला होता. ७ डिसेंबर २०१८ रोजी ससून रुग्णालयाच्या समितीने इंजेक्शनमुळे गंभीर आजार झाल्याचा स्पष्ट अहवाल दिला. त्यानुसार कोलंबिया एशिया हाँस्पिटचे इंजेक्शन देण्याच्या सूचना देणारे दोन डाँक्टर सह इंजेक्शन देणार्या ब्रदर व या सर्व गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्या रुग्णालय प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ सोडनवार करीत आहेत.