आळंदी - मरकळ रस्त्यावरील धानोरे येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:27 PM2024-07-17T12:27:26+5:302024-07-17T12:27:39+5:30
अग्निशमन दलाला दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले
आळंदी : आळंदी - मरकळ रस्त्यावरील धानोरे फाटा (ता.खेड) येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज (दि.१७) पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. सुदैवाने सदर आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आगीची व्याप्ती वाढत असल्याने पीएमआरडीए व पीसीएमसी अग्निशमन दलांना देखील घटनास्थळी पाचारण करून दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.
धानोरे फाटा परिसरात आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यापूर्वीही या परिसरात असलेल्या औद्योगिक कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान बुधवारी पहाटे येथील वैशाली असेमेंट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आग लागली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिस व मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कंपनीमध्ये आगी दरम्यान स्फोट होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर इतरत्र पसरत होती. परिणामी अग्निशमन दलांकडून फोम मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीसुद्धा घटनास्थळी कंपनीमध्ये रासायनिक केमिकल मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. त्यामुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान आगीच्या वाढत्या घटनांचा स्थानिक नागरिकांनी धसका घेतला आहे.
सदरची आग विझविण्यात आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या विनायक सोळंकी, प्रसाद बोराटे, पदमाकर श्रीरामे, अक्षय त्रिभुवन, तुळशीराम कोळपे या कर्मचाऱ्यांसह पीएमआरडीए व पीसीएमसी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. घटनास्थळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके व आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.