फायर ऑडिट’ झाले; ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी’ ऑडिटचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:05+5:302021-05-01T04:11:05+5:30
अग्निशामक दलाकडून सलग दोन दिवस अहोरात्र काम करून फायर ऑडिटचे काम पूर्ण केले. त्याचा अहवाल अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत ...
अग्निशामक दलाकडून सलग दोन दिवस अहोरात्र काम करून फायर ऑडिटचे काम पूर्ण केले. त्याचा अहवाल अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना सादर केला. अग्निशामक दलाने सादर केलेल्या अहवालामध्ये ६१ रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणेमधील त्रुटी दूर करण्याच्या रुग्णालयांच्या व्यवस्थापनांना नोटीस देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
-----
पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी विभागीय आयुक्तांनीही विभागातील सर्वच जिल्ह्यांतील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाने संयुक्तपणे हे ऑडिट करताना मोठी चेकलिस्ट दिली आहे. तसेच दोन्ही पालिकांसोबतच जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची जबाबदारीही दोन्ही महापालिकांवर सोपविण्यात आली आहे.
---
विभागीय आयुक्तांनी काढलेल्या आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी पालिकेचे दुसरे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनीही शहरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश दिले. त्यामुळे एकाच ऑडिटसाठी तीन तीन आदेश काढण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्याची जबाबदारी ही संबंधित रुग्णालयांकडेच आहे. नुसते फायर ऑडिट केल्याने दुर्घटना टळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
----
पालिकेच्या विद्युत विभागाकडून पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. यासाठी अभियंत्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि महापालिकेचे अभियंते संयुक्तपणे दोन दिवसांत इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करणार आहेत. पालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्येही विद्युत अभियंत्यांकडून नियमित पाहणी केली जाणार आहे.
- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग