पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातानंतर अग्नीतांडव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 03:59 AM2023-09-02T03:59:57+5:302023-09-02T04:00:37+5:30
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यवत : पुणे सोलापूर महामार्गावर सहजपूर (ता. दौंड) फाटा नजीक उभ्या असलेल्या ट्रेलरला केमिकल घेऊन जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अपघाताचे नेमके कारण समजले नसून घटनास्थळी यवत पोलीस व अधिकारी दाखल झाले आहेत. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात होते. अपघातामुळे महामार्गावर सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झालेली होती.अपघातात तीन वाहणे आगीत जाळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघात नेमका कसा झाला, काही जिवितहानी झाली का याबाबतची माहिती रात्री उशिरा पर्यंत मिळाली नाही.
दरम्यान, केमिकल घेऊन जाणारा टेम्पो कंटेनरला धडकल्यानंतर मोठी आग लागली. टेम्पो मधील पेटते केमिकल महामार्गाच्या बाजूला ढाब्याच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या टेम्पोवर पडल्याने, तो टेम्पो देखील आगीच्या भक्षस्थानी पडला. लागलेल्या आगीत तीन ट्रक अक्षरशः जळून खाक झाले.सदर अपघातात एका वाहनाचा चालक आगीत भाजला असून त्याला उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.