Pune | पिरंगुटमध्ये सुजानिल केमो कंपनीमध्ये आगीचे तांडव; बॅरलमधील केमिकलला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 08:38 PM2023-02-20T20:38:10+5:302023-02-20T20:48:19+5:30
बॅरलमधील असलेल्या केमिकलला उन्हामुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे
पिरंगुट (पुणे) : पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील सुजानील केमो इंडस्ट्रीज कंपनीमध्ये भीषण आग लागली. सुदैवाने गेले दोन ते अडीच वर्षांपासून ही कंपनी बंद असल्याने या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पिरंगुट (लवळे फाटा) येथे आशिष देसाई व हिरण देसाई यांच्या मालकीची सुजानिल केमो इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये शेतीवरील किटकनाशके फवारण्यासाठी लागणाऱ्या औषधाची निर्मिती केली जात होती. परंतु गेले दोन ते अडीच वर्ष झालं ही कंपनी बंद असून या कंपनीमध्ये केमिकल तयार करण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल मात्र स्टोअर करून ठेवण्यात आलेले आहे. तेव्हा त्यातील काही बॅरल हे कंपनीच्या थोडे बाहेर होते. तेंव्हा त्या बॅरलमधील असलेल्या केमिकलला उन्हामुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही आग लागल्यानंतर थोड्याच वेळात या आगीने मोठे रुद्र रूप धारण केले होते. हवेमध्ये काळ्या धुराचे लोट उडताना दिसत होता. या आगीमध्ये मोठमोठ्या स्फोटांचे आवाज देखील येत होते. तेव्हा या संपूर्ण घटनेची माहिती पौड पोलीस स्टेशनला देण्यात आली. तेव्हा तत्काळ पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व ग्रामस्थांनी लागलीच अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत महावितरणचे बनकर व त्यांच्या सहकार्याने विद्युत पुरवठा खंडित केला.
पोलिसांनी व स्थानिकांनी आग लागलेल्या कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असलेल्या मानव वस्तीमधील रहिवाशांना स्वसंरक्षणासाठी आपली घरे सोडून बाजूला जाण्यास सांगितले. दुर्घटनेनंतर वीस ते पंचवीस मिनिटांच्या कालावधीमध्ये पीएमआरडीए मारुंजी येथील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व जवळपास एक ते दीड तासाच्या अथक परिसरानंतर त्यांनी ही संपूर्ण आग आटोक्यात आणली.
ही संपूर्ण आग विझविण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड, नितीन गार्डी, चंद्रकांत नवणे, निवास जगदाळे, महादेव गोळे, किरण गोळे, रमेश पवळे, राजाभाऊ वाघ,ओजस पाटील, सचिन पवळे, मनोज पवळे, वैभव पवळे, गणेश बलकवडे, दत्तात्रय आहेर, गौरव गोळे, रामदास गोळे, अंकुश नलावडे, गणेश पवळे, सौरभ पवळे, विशाल धोत्रे, नवनाथ पवळे, गणेश गोळे, विकास पवळे, किरण देव, रामदास पवळे,अनुराग पवळे व इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.