Fire breaks out at Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत 5 जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 06:12 PM2021-01-21T18:12:48+5:302021-01-21T18:43:17+5:30
Fire breaks out at Serum Institute : पुण्यातील मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला ही आग लागली.
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
"सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. आता आग विझवण्यात आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत," असे राजेश टोपे म्हणाले. याचबरोबर, कोरोना लस निर्मिती जिथे होते, ती इमारत घटनास्थळापासून लांब आहे. त्यामुळे कोरोना लसीचे कोणतेही नुकसान नाही. यासंदर्भात पोलिस तपास सुरु आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
दुसरीकडे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, " या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या इमारतीचे बांधकाम सुरु होते. तिथे विजेचे आणि वेल्डिंगचे काम सुरु होते, त्यादरम्यान ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतांमध्ये इमारतीचे बांधकाम करणारे कंत्राटी कामगार असू शकतात."
दरम्यान, पुण्यातील मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला ही आग लागली. मात्र, सुदैवाने ज्या इमारतीमध्ये कोव्हिशील्ड लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या इमारतीमध्ये आग आगली. त्यामध्ये बीसीजी विभाग आहे. या इमारतीत बीसीजीची लस तयार करण्याचे काम चालते. कोरोना लसीचे संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचे सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट मोठी लस उत्पादक कंपनी
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सीरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.