राज्यातील अग्निशामक दलांना महिलांचे ‘वावडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:05 AM2018-09-09T01:05:45+5:302018-09-09T01:05:59+5:30
स्त्रीवादी चळवळी आणि पुरोगामित्वाचा डंका वाजविणाऱ्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व अग्निशामक दलांना अद्यापही महिलांचे ‘वावडे’ असल्याचे वास्तव समोर आले आहे.
- लक्ष्मण मोरे
पुणे : स्त्रीवादी चळवळी आणि पुरोगामित्वाचा डंका वाजविणाऱ्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व अग्निशामक दलांना अद्यापही महिलांचे ‘वावडे’ असल्याचे वास्तव समोर आले आहे. मुंबई वगळता एकाही महापालिकेने अथवा नगर परिषदेने अग्निशामक दलांमध्ये महिलांची भरतीच केलेली नसल्याने शासनाच्या ३० टक्के महिला नोकरभरतीच्या आदेशालाच हरताळ फासला गेला आहे.
मुंबईपाठोपाठ पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूर या मेट्रो शहरांसोबतच औरंगाबाद, नाशिकसारख्या मोठ्या शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. यासोबतच उद्योगधंद्यानिमित्त स्थलांतरित होणाºयांमुळे या शहरांची लोकसंख्या वाढत चालली आहे. महत्त्वाच्या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या कक्षाही विस्तारत चालल्या आहेत. ज्यातुलनेत या शहरांचा विस्तार होत आहे; त्यातुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या वाढताना दिसत नाही.
पोलीस, महापालिका, महसूल विभाग, लष्करासह सर्वच क्षेत्रांत महिला सामान्य कर्मचारी ते उच्च पदांवर काम करीत आहेत. राज्यातील महापालिकांमध्ये महिला महापौर, नगराध्यक्षांसह नगरसेविकांचे प्रमाण लक्षणीय आहे. यासोबतच महिला आमदार व खासदारांची संख्याही लक्षणीय आहे. मुंबई महापालिकेने अग्निशामक दलामध्ये ६ वर्षांपूर्वी महिला भरतीचा प्रयोग केला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. परंतु, दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगाला प्रतिसाद लाभला. सध्या मुंबई अग्निशामक दलामध्ये १२० महिला कर्मचारी पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. मात्र, उर्वरित २१ महापालिका, २५० नगर परिषदा व १२९ नगरपंचायतींनी महिलांची भरती केलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे अध्यक्ष प्रभात रहांगदळे यांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी अग्निशामक दलांमधील महिलांची पदे भरली पाहिजेत, असे स्पष्ट केले आहे.
>मुंबई महापालिकेने धोरण तयार करून महिलांची अग्निशामक दलात भरती केली. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने पुरुषांसाठी असलेल्या फायरमन व तत्सम प्रशिक्षणासाठी महिलांना प्रवेश
देण्याचे धोरण निश्चित केले आहे. फक्त पुरुषांनाच हे कोर्सेस करता
येत होते. यापुढे महिला हे कोर्सेस करू शकणार आहेत. मुंबई वगळता राज्यातील अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने अग्निशामक दलात महिलांची भरती केलेली नाही. वास्तविक, ३० टक्क्यांच्या निकषानुसार
ही भरती करणे आवश्यक आहे.
- प्रदीप रहांगदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, म. रा.