अग्निशामकच्या जवानांना ५ वर्षांत एकदाच गणवेश
By admin | Published: May 11, 2015 06:27 AM2015-05-11T06:27:01+5:302015-05-11T06:27:01+5:30
मुंबई अग्निशामक दलाच्या तुलनेत पुणे अग्निशामक दलातील जवानांना पुरविण्यात आलेले गणवेश अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे आहेत.
पुणे : मुंबई अग्निशामक दलाच्या तुलनेत पुणे अग्निशामक दलातील जवानांना पुरविण्यात आलेले गणवेश अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे काळबादेवीसारखी आगीची घटना पुण्यात घडल्यास जवानांच्या जीवितास मुंबईपेक्षा कैकपटीने जास्त मोठा धोका पोहचू शकतो, अशी भावना जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
मुंबईमध्ये काळबादेवी येथील एका लाकडी इमारतीला लागलेल्या आगीत दोघा अग्निशामक अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला, मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांसह सहा जण गंभीर जखमी झाले. एका इमारतीच्या आगीत एवढ्या मोठया प्रमाणात नुकसान पोहोचल्याने राज्यभरातील जवानांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर जवानांशी संवाद साधला असता, त्यांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या निकृष्ट साधनांविषयी मोठी नाराजी व्यक्त केली. महापालिकेने दर वर्षी अग्निशामक जवानांना चांगल्या दर्जाचा गणवेश पुरविणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने २०११ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून नागपूरच्या एका ठेकेदारास गणवेश पुरविण्याचा ठेका दिला. अग्निशामक दलामध्ये ५०० पेक्षा जास्त जवान आहेत, त्यांना एकाच वेळी दोन गणवेशाचे संपूर्ण सेट त्याने पुरविणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराने शर्ट, पँट त्यानंतर कोट, बुट असा सुटा गणवेश पुरविला. त्यामुळे काही जवानांना शर्ट, पँट मिळाली, तर कोट मिळाला नाही. काही जणांना बूट मिळाले, टोपी मिळाली नाही. हा गणवेश पुरविण्यास त्याने दीड-दोन वर्षांचा कालावधी घेतला. वस्तूत: दर वर्षी गणवेश दिला जाणे आवश्यक असताना गेल्या ५ वर्षांत केवळ एकदाच गणवेश पुरविला आहे. जवानांना हेल्मेट अद्याप पुरविण्यात आलेले नाहीत. दुर्घटनेच्यावेळी अशा अपुऱ्या साधनांनिशी जर आग विझविण्यासाठी गेले, तर नक्कीच त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकेल, अशी भावना जवानांनी व्यक्त केली.
फायर एंट्रीसुट अपुरे
दुर्घटनेमध्ये फायरएंट्री सुट घातल्याशिवाय जवानांना आत जाता येत नाही, पुणे अग्निशामक दलाकडे केवळ १० ते १३ फायर एंट्रीसुट आहेत. प्रत्येक अग्निशामक केंद्रास एक असे त्याचे वाटप केले आहे. त्याचबरोबर आगीशी सामना करताना आवश्यक असणारे हेल्मेटही पुरविण्यात आलेले नाहीत.
ंधोकादायक वाड्यांचा सर्व्हे करणे आवश्यक
शहराच्या मध्यवस्तीत अनेक मोडकळीस आलेले जुने वाडे आहेत. बहुतांश वाडे हे लाकडांचे बांधण्यात आले आहेत. या वाड्यांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास ती आटोक्यात आणणे खूपच जिकिरीचे ठरू शकते. शहरातील धोकादायक वाड्यांचा सर्व्हे करून त्याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. तसेच वाड्यांमधील इलेक्ट्रिक वायरिंग व्यवस्थित आहे ना, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे मत अग्निशामक जवानांनी व्यक्त केले.