अभिमानास्पद ! दाेन हजाराहून अधिक पक्ष्यांचे फायर ब्रिगेडने वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 08:05 PM2020-01-10T20:05:14+5:302020-01-10T20:06:18+5:30
नागरिकांचे प्राण वाचविण्याबराेबरच मुक्या प्राण्यांचे प्राण देखील फायर ब्रिगेडच्या जवानांनी वाचवले आहेत.
पुणे : आपल्या आजूबाजूला कुठलिही आपत्ती आली की मदतीसाठी आपला पहिला फाेन जाताे ताे फायर ब्रिगेडला. कुठे आग लागलेली असाे की एखाद्याने नदीत उडी मारुन आत्महत्येचा केलेला प्रयत्न असाे. फायर ब्रिगेडचे जवान 365 दिवस 24 तास नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. केवळ नागरिकांच्याच नाही तर मुक्या प्राण्यांच्या देखील मदतीसाठी हे जवान तत्पर असल्याचे समाेर आले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या जवानांनी गेल्या 10 वर्षांमध्ये तब्बाल 2 हजार चारशे 60 पक्षांना जीवनदान दिले आहे. वस्तुतः हे काम फायर ब्रिगेड विभागाचे नसताना देखील कुठूनही एखादा पक्षी वायरमध्ये, मांज्यामध्ये अडकल्याचा काॅल आल्यास फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी हजर हाेतात आणि जीवावर उदार हाेऊन त्या पक्षाचे प्राण वाचवतात. काही दिवसांपूर्वी एका वायरमध्ये अडकलेल्या वटवागुळाला साेडवताना त्या वडवागुळाने जवानाच्या हाताचा चावा घेतला. वटवागुळ चावल्याची पहिलीच घटना असल्याने त्याची लस देखील उपलब्ध नव्हती. अनेकदा उंच वायरमध्ये अडकलेल्या पक्षाला साेडवताना जवानांच्या जीवाला धाेका असताे. तरी देखील त्याची पर्वा न करता हे जवान पक्षांचे जीव वाचविण्याचे प्रयत्न करतात. केवळ पक्षीच नाही तर इतर प्राण्यांची देखील या जवानांनी सुटका केली आहे.
याविषयी बाेलताना पुण्याच्या फायर ब्रिगेड विभागाचे नियंत्रण कक्षाचे फायरमन निलेश महाजन म्हणाले, गेल्या 10 वर्षात दाेन हजारांहून अधिक पक्ष्यांचा फायर ब्रिगेडच्या जवानांनी सुटका केल्याची आकडेवारी समाेर येते तेव्हा अभिमान वाटताे. कुठल्याही जीवाची रक्षा करण्यासाठी त्यांना वाचविण्यासाठी आमचे जवान नेहमीच तत्पर असतात. कुठली आपत्ती असाे, की एखादे झाड पडले असाे. नागरिक पहिला फाेन फायर ब्रिगेडला करतात. आपचे जवान क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल हाेत असतात. पक्षी अडकल्याचे अनेक फाेन येत असतात. अनेकदा अडकलेल्या पक्षांना साेडविताना जवानांना जीवावर उदार हाेऊन काम करावे लागते. परंतु तरीही जवान नकार देत नाहीत.