कालव्यात बुडणा-या महिलेला अग्निशामक दलाच्या जवानाने वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 08:08 PM2018-11-20T20:08:45+5:302018-11-20T20:09:12+5:30
कालव्यामधून जनता वसाहतमध्ये राहणारी ३० वर्षीय महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांनी पाहिले.
पुणे : जनता वसाहत येथील कालव्यात बुडत असलेल्या एका महिलेस अग्निशमन दलाच्या जवानाने जीवाची बाजी लावून वाचवले. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.
कालव्यामधून जनता वसाहतमध्ये राहणारी ३० वर्षीय महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांनी पाहिले. त्याचवेळी नागरिकांनी जनता वसाहत येथे नुकत्याच सुरू झालेल्या अग्निशमन केंद्रातील जवान विनायक माळी यांना याबाबत वर्दी दिली. जवान माळी यांनी त्यांचे सहकारी जवान सचिन आवाळे यांना सांगताच आवाळे यांनी क्षणाचा ही विलंब न करता अंगावरील गणवेश उतरवून लगेचच पाण्यात उडी मारली. त्यांनी कालव्यात उडी मारताच सदर महिलेचे अंतर पाहून त्यांनी शिताफीने तेवढे अंतर पार केले व बुडणा-या महिलेला बाहेर काढले. महिलेला प्राथमिक उपचार दिल्यानंतर शासकीय रुग्णवाहिका बोलावून दवाखान्यात रवाना केले. सदर महिलेने नेमकी कशामुळे उडी मारली अथवा नेमके काय घडले याचा अधिक माहिती समजू शकली नाही. जवान आवाळे यांनी केलेल्या या कामगिरीने तेथील स्थानिक ही अवाक होत पाहतच राहिले. आवाळे हे गेल्या सहा वषापार्सून पुणे अग्निशमन दलामधे कार्यरत असून त्यांनी दिवाळीमधे देखील अशीच कामगिरी करत एका पुरुष व महिलेला जिंवत बाहेर काढले होते.