भीषण आगीत कारखाना जळून खाक
By admin | Published: October 12, 2016 02:43 AM2016-10-12T02:43:16+5:302016-10-12T03:09:09+5:30
: कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील पटनी फोम्स प्रा. लि . या लघु उद्योग कंपनीस मंगळवार (दि.११) सध्याकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या आगीत रात्री
कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील पटनी फोम्स प्रा. लि . या लघु उद्योग कंपनीस मंगळवार (दि.११) सध्याकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या आगीत रात्री आठ वाजेपर्यंत पुर्ण कंपनी जळुन राख झाली.
जवळपास तीन तासा पेक्षा जास्त काळ चाललेल्या या आगीमुळे कुरकुंभ,पांढरेवाडी व परिसरातील रासायनिक कंपनीतील सारेचजण धास्तावले होते. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन दसऱ्याच्या सुट्टीमुळे जिवीत हानी टळली असल्याची प्राथमिक माहीती पुढे आली आहे.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील पटनी फोमस ही पोलीअल व टोल्युन डाय आयसोयन (टी डी आय ) या रसायनाच्या रासायनिक प्रक्रीयेपासुन गाद्या बनवण्याचे उत्पादन करते. या औद्योगिक क्षेत्रामधील लघु उद्योग स्वरुपाची ही कंपनी असुन या ठिकाणी गाद्यांमध्ये वापरण्यात येणारा फोम उत्पादित केला जातो.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच अन्य कंपनीच्या माध्यमातुन आलेल्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या साठी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र, कारगील, ओनर लँब, सिप्ला, एम क्युअर, दौंड नगर परिषदेच्या सह अन्य अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र पाण्याची कमतरता सातत्याने भासली.
या घटनेचे प्रसंगावधान राखुन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रणात्मक कार्यवाही केली. रात्रीनंतर ही आग अखेरीस आटोक्यात आली. (वार्ताहर)
महिन्याभरातील
दुसरी घटना
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील एका महिन्याच्या आत झालेली ही दुसरी भयंकर घटना असुन त्यामुळे कुरकुंभ पांढरेवाडी येथील नागरिक अत्यंत भितीदायक वातावरणात असल्याचे जाणवते दरम्यान या स्पोटामुळे या औद्योगिक क्षेत्रामधील खदखद अजुन सुरुच आहे. एका छोट्या कंपनीत झालेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवणे जर इतके कठिन असेल तर मोठ्या रासायनिक कंपनीला जर अशा प्रकारची घटना घडली तर काय परिणाम होतील याची प्रचीती येथील ग्रामस्थांना आली आहे.