गणेशनगरमध्ये घराला आग, विझविण्यासाठी नगरसेवक सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:57 AM2018-11-14T01:57:47+5:302018-11-14T01:59:01+5:30
नगरसेवकाने विझविली आग : लहान मुलगा बचावला
कात्रज : अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांमुळे आपल्या लहान मुलांचा जीवदेखील धोक्यात येऊ शकतो. याचा प्रत्यय आज दुपारी १२.३०च्या सुमारास अप्पर येथील गणेशनगर गल्ली क्रमांक ३ मधील नागरिकांना आला. गणेशनगर गल्ली क्रमांक ३ मधील चाळीत दुसऱ्या मजल्यावर राहणारे रमेश दाभाडे पेंटर काम करतात, त्यांच्या पत्नी सुनीता दाभाडे घरगुती व्यवसाय करतात. कामानिमित्त हे दोघेही बाहेर गेले असता, घरामध्ये त्यांचा पाचवीत शिकणारा मुलगा प्रथमेश दाभाडे बसला होता.
अचानक आग लागल्यामुळे घाबरलेला प्रथमेश जोरात रडू लागला. तो खाली पळाला. चाळीत आरडाओरडा सुरू झाली. त्याच वेळी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल व त्यांचे कार्यकर्ते या घरात शिरले, शेजारच्या मदतीने त्यांनी आगीवर पाणी मारण्यास सुरुवात केली. गॅस टाकी काढून बाहेर टाकण्यात आली. ओसवाल यांनी तातडीने अग्निशामक व पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही आग अजून आतमधील घरात असती, तर अग्निशामक दलाच्या जवानांनादेखील त्या ठिकाणी जाणे जिकिरीचे ठरले असते. आजच्या या घटनेनंतर या भागात अतिक्रमणांमुळे आपला जीव कसा धोक्यात आहे, याची चर्चा होती.
कोंढवा-कात्रज येथून तीन गाड्या १० मिनिटांच्या आत दाखल झाल्या; मात्र आग लागलेल्या ठिकाणी गाडीला अतिक्रमणांमुळे जाता आले नाही. सुमारे २०० मीटर पाइप लावून अग्निशामक दलाच्या जवानांनी राहिलेली आग पूर्णपणे विझविली.