आयसर संस्थेच्या आवारातील प्रयोगशाळेत आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:17+5:302021-07-17T04:09:17+5:30
पुणे : पाषाण रस्त्यावरील आयसर संस्थेच्या आवारातील एका इमारतीमधल्या प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपारी आग लागली. आग लागल्यानंतर प्रयोगशाळेतील कर्मचारी ...
पुणे : पाषाण रस्त्यावरील आयसर संस्थेच्या आवारातील एका इमारतीमधल्या प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपारी आग लागली. आग लागल्यानंतर प्रयोगशाळेतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्याने गंभीर स्वरूपाची दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग आटोक्यात आणली.
आयसर संस्थेच्या एका इमारतीतील प्रयोगशाळेतून दुपारी १२.१५ च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, गजानन पाथ्रूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत प्रयोगशाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर प्रयोगशाळेतील कर्मचारी तातडीने बाहेर पळल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.
आग आटोक्यात आल्यानंतरही सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचा बंब आणि जवान तेथे थांबले होते. आग पूर्णपणे आटोक्यात आल्याची खात्री पटल्यानंतर जवान संस्थेच्या आवारातून बाहेर पडले.
---