येरवड्यातील नेताजी हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:25+5:302021-03-25T04:12:25+5:30
येरवडा : नेताजी बोस हायस्कूल हायस्कूलच्या चौथ्या मजल्यावरील रेकॉर्ड रूमला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. या ...
येरवडा : नेताजी बोस हायस्कूल हायस्कूलच्या चौथ्या मजल्यावरील रेकॉर्ड रूमला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड जळून खाक झाले. शाळेच्या महिला सुरक्षारक्षक वैशाली काशीद यांनी प्रसंगावधान राखून वेळीच अग्निशमन दलाला माहिती दिल्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. या घटनेमुळे पुन्हा एकदा नेताजी हायस्कूलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शाळेची सध्याची दुरवस्था, अनेक समस्या या सर्व बाबींकडे होणारे स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष याबाबत माजी विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
येरवड्यातील नेताजी बोस हायस्कूलच्या चौथ्या मजल्यावर असणाऱ्या रेकॉर्ड रूममधून सकाळी आठच्या सुमारास धूर येत होता. यावेळी ड्युटीवर असणाऱ्या महिला सुरक्षारक्षक वैशाली काशीद यांनी चौथ्या मजल्यावर जाऊन पाहिल्यावर रेकॉर्ड रूममधून हा धूर येत होता. तत्काळ शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा ढगे यांना घटनेची माहिती देऊन अग्निशमन दल व पोलिसांना त्यांनीही माहिती कळवली. नायडू अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन फायरगाडी व देवदूतच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड साहित्य कागद जळून खाक झाले आहे. तिसऱ्या मजल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. उपस्थित शिक्षक व महिला सुरक्षारक्षक यांनी तत्काळ विद्यार्थ्यांना मैदानात घेऊन गेले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शाळेच्या आवारातील खिडक्या तसेच ग्रीलची मोडतोड झालेली आहे. शाळेच्या आवारात स्थानिक अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून नासधूस व गैरवापर केला जातो. शाळेच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापालिका प्रशासन उदासीन आहे.
नायडू अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर विजय भिलारे, फायरमन सुनील वाघमारे, हिरामण मोरे, भानुदास घुले दिलीप भालेराव, देवदूत वरील सेवक अमृता रुपनवर, आदित्य गुंजाळ, शिवाजी कोंढरे, चालक अनुप साबळे यांच्या पथकाने आटोक्यात आग आणली.
फोटो ओळ : येरवडा येथील नेताजी हायस्कूलच्या चौथ्या मजल्यावरील रेकॉर्ड रूमला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलातील कर्मचारी.
(फोटा - येरवडा आग नावाने)